डीसीपींच्या बंगल्याच्या परिसरात चोरी करणारे चंदनचोर गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 12:11 AM2021-07-30T00:11:54+5:302021-07-30T00:12:53+5:30
sandalwood theives arrested पोलीस उपायुक्त नुरूल हसन यांच्या शासकीय निवासस्थानातून चंदनाचे झाड कापून चोरून नेणाऱ्या तीनपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - पोलीस उपायुक्त नुरूल हसन यांच्या शासकीय निवासस्थानातून चंदनाचे झाड कापून चोरून नेणाऱ्या तीनपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली. राजेश ऊर्फ राजा केशवराव गुजरवार (वय ३४, रा. गोन्ही, ता. काटोल) आणि रुपेश गोकुल मुरडिया (वय २८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
उपायुक्त नुरूल हसन यांच्या शासकीय निवासस्थानाच्या बाजूने मोठा नाला वाहतो. त्या नाल्यच्या काठावरून आरोपी राजेश, रुपेश आणि त्यांचा तिसरा साथीदार ओमप्रकाश ऊर्फ सचिन तेजराम गुजरवार (रा. गोन्ही) हे तिघे नुरूल हसन यांच्या निवासस्थानाच्या मागच्या बाजूला शिरले.
११ आणि १२ जुलैच्या रात्रीदरम्यान त्यांनी तेथील चंदनाचे झाड कापले आणि नाल्याकडूनच पळून गेले. ही घटना उघडकीस येताच पोलीस दलात चांगलीच धावपळ निर्माण झाली. दरम्यान, सदर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून आजूबाजूच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी ऑटोने आल्याचे स्पष्ट झाले. तो धागा पकडून पोलिसांनी आरोपी राजेश आणि रुपेशच्या २६ जुलैला मुसक्या बांधल्या. त्यांच्याकडून झाडाच्या कापून तयार केलेल्या कांड्या, खिपल्या असा एकूण १६,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस उपायुक्त विनिता साहू, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संतोष बाकल, पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक विलास मोटे, एएसआय अजय गर्जे, हवालदार भास्कर रोकडे, विजेंद्र यादव, हरिश बढिये, सुधीर मडावी, आशिष बहाळ आणि रुपेश हिवराळे यांनी ही कामगिरी बजावली.
अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
आरोपींनी त्यांचा फरार असलेला तिसरा साथीदार ओमप्रकाश गुजरवार हा या चोरीमागचा सूत्रधार असल्याचे सांगितले. त्याला अटक केल्यानंतर अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता ठाणेदार संतोष बाकल यांनी वर्तविली आहे.