चोरट्यांनाही हवी एनर्जी, दुकान फोडून एनर्जी ड्रिंक्सच पळविले
By योगेश पांडे | Published: July 8, 2024 07:51 PM2024-07-08T19:51:35+5:302024-07-08T19:51:43+5:30
रात्रभरात पाच ठिकाणी घरफोडी
नागपूर: आरोग्यासाठी फायदेशीर नसले तरी तरुणाईमध्ये एनर्जी ड्रिंक्सचे क्रेझ दिसून येते. बहुतेक नागपुरातील चोरट्यांनादेखील या ड्रिंक्सची भुरळ पडली आहे. म्हणूनच की काय चोरट्यांनी एक दुकान तोडून तेथून चक्क एनर्जी ड्रिंक्सचे बॉक्स व सिगारेटवरच हात मारला. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. आश्चर्याची बाब म्हणजे चोरट्यांनी रात्रभरात पाच घरे, दुकाने फोडली.
प्रशांत उर्फ सोनू सुभाष गायकवाड (३४, धन्वंतरी नगर) यांचे मेडिकलमध्ये चहाचे कॅंटिन आहे. ६ जुलै रोजी घराला कुलूप लावून ते कुटुंबियांसह नातेवाईकाकडे गेले. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांचे घर फोडले व घरातील सोन्याचांदीचे दागिने तसेच रोख पाच हजार रुपये लंपास केले.
त्यांच्याच गल्लीत राहणारे संजय भुते हे कुटुंबियांसह बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या घराकडे मोर्चा वळविला व तेथून ४१ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. त्यानंतर चोरटे संकल्पनगर येथील चंद्रशेखर मेश्राम यांच्या घरी पोहोचले. मेश्राम त्यांच्या घराला कुलूप लावून साळ्याकडे गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या घरातून ४० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. वाठोडा चौकात शुभम राखडे याचे स्नॅक्सचे दुकान आहे. चोरट्यांनी रात्री ते दुकानदेखील फोडले व एनर्जी ड्रिंक्सचे दोन मोठे बॉक्स, सिगारेट पॅकेट्स, एलईडी टीव्ही लंपास केले. या दुकानाअगोदर चोरट्यांनी राजू रासेकर यांच्या घरात प्रवेश करत ३८ हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता.
पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
एकाच रात्री चोरट्यांनी पाच ठिकाणी घरफोडी केल्याने नंदनवन पोलीस ठाण्याच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. चोरट्यांनी सर्व घरांची रेकी केली होती व रात्री तेथे धडक दिली. या परिसरात पोलिसांची हवी तशी गस्त नसल्याची नागरिकांकडून ओरड होत आहे.