चोरट्यांना आंब्याचा मोह, सिनेस्टाईल चोरी; ३३० किलो आंबे चालत्या ट्रकमधून केले लंपास
By योगेश पांडे | Published: May 30, 2024 06:20 PM2024-05-30T18:20:50+5:302024-05-30T18:21:34+5:30
ताडपत्री बाजुला करत त्यांनी पोत्यांमध्ये आंबे भरणे सुरू केले. वाहतूक कोंडी दूर झाल्यावर ट्रक कळमन्याच्या दिशेने जात असताना चोरटे आंबे पोत्यांमध्ये भरत होते.
नागपूर - उन्हाळ्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आंब्याचा मोह आवरत नाही. यात चोरटेही मागे राहिलेले नाही. नागपुरातील पाच चोरट्यांनी चक्क ३३० किलो आंबे चालत्या ट्रकवर चढून सिनेस्टाईल चोरी केले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करत पाच चोरट्यांना अटक केली आहे. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
नागभूषण बालैय्या अपन्नाशेट्टी (४४, करीमनगर, बुम्मकल्ल, तेलंगणा) यांनी टीएस ०२ यूसी १४३५ या ट्रकमध्ये ३२ क्विंटल कच्चे आंबे लोड केले व ते नागपुरच्या दिशेने घेऊन निघाले. २७ मे रोजी सकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास चिखली चौकाच्या पुढे ट्रॅफिक जाम असल्याने ट्रक थांबला. त्यावेळी पाच ते सात अनोळखी आरोपी मागून ट्रकवर चढले. ताडपत्री बाजुला करत त्यांनी पोत्यांमध्ये आंबे भरणे सुरू केले. वाहतूक कोंडी दूर झाल्यावर ट्रक कळमन्याच्या दिशेने जात असताना चोरटे आंबे पोत्यांमध्ये भरत होते. एका कारचालकाने अपन्नाशेट्टी यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी काही अंतरावर ट्रक थांबविला व मागे जाऊन पाहिले असता तीन तरुण हातात आंब्याने भरलेले पोते घेऊन उतरताना दिसले. ते अपन्नाशेट्टी यांना धक्का मारून पळून गेले. त्यानंतर अपन्नाशेट्टी समोरील भागात गेले असता आणखी तीन तरूण पोते घेऊन पळताना दिसले. त्यांच्यातील एका तरुणाने मोठा दगड मारत ट्रकची काच फोडली.
अपन्नाशेट्टी यांनी व्यापारी निलेश पटेल यांना माहिती दिली व कळमना पोलीस ठाण्यात तक्रार केली. मालाचे वजन केले असता ३३० किलो आंबे चोरी झाल्याची बाब समोर आली. पोलिसांनी गुन्हा नोंदविल्यावर सीसीटीव्ही फुटेज व खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून तपास केला. प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी नारायण उर्फ नाऱ्या सुनिल तंडण (२२, तलमले ले आऊट, ओमनगर), अंकुश उर्फ लंकेश विलास चांडोले (१९, नागेश्वरनगर), मोहम्मद अक्रम रुस्तम शेख (२१, गौरीनगर), कृष्णकांत उर्फ राम संजय काळे (२२, पारडी), शेखर कलीम शेख सलीम (२२, म्हाडा क्वॉर्टर, चिखली) यांना ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून ३३० किलो आंबे जप्त करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुल महाजन, उज्वल इंगोले, गंगाधर मुटकुरे, विशाल अंकलवार, विशाल भैसारे, यशवंत अमृते, ललित शेंडे, वसीम देसाई यांच्या पथकाने ही कारवाई केली.