सुटीनिमित्त मूळगावी गेले अन् चोरट्यांनी बॅंक व्यवस्थापकाचे घर फोडले
By योगेश पांडे | Published: August 18, 2023 05:22 PM2023-08-18T17:22:29+5:302023-08-18T17:23:38+5:30
२ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला
नागपूर : लागून सुट्या असल्याने मूळगावी गेलेल्या बॅंक व्यवस्थापकाचे घरच चोरट्यांनी फोडले. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
वैभव मधुकर डोंगरे (३१, स्मृती ले आऊट, दत्तवाडी) हे एका खाजगी बॅंकेत व्यवस्थापक आहेत. ते १२ ऑगस्ट रोजी कुटुंबियांसह मूळगाव असलेल्या आर्वी येथे गेले. त्यानंतर अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी बेडरूममधील कपाटातील सोन्याचे दागिने तसेच दिवाणी व कपाटात ठेवलेले रोख ९३ हजार रुपये असा एकूण २ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला.
घरी परत आल्यावर वैभव यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी नेलेल्या दागिन्यांमध्ये त्यांच्या सासूच्या दागिन्यांचादेखील समावेश होता. वैभव यांनी वाडी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात घरफोडीचा गुन्हा नोंदविला असून त्यांचा शोध सुरू आहे.