नागपुरात अधिवेशनाच्या तोंडावर चोरटे सुसाट, दोन घरे फोडत लाखोंचा माल लंपास
By योगेश पांडे | Published: December 6, 2023 06:00 PM2023-12-06T18:00:45+5:302023-12-06T18:02:04+5:30
अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत चोरी केली आहे.
नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर पोलिस बंदोबस्त असताना चोरटेदेखील संधीच्या शोधातच असल्याचे चित्र आहे. वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी शेजारची दोन घरे फोडत लाखोंचा मुद्देमाल लंपास केला.
सूरज सिंघामणी राणा (५३, सुरक्षीनगर, खरबी) हे ४ डिसेंबर रोजी घराला कुलूप लावून कुटुंबीयांसह लग्नाच्या कार्यक्रमासाठी गोंदियाला गेले होते. त्यानंतर अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटाचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख साडेबारा हजार रुपये, असा साडेचार लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. त्यानंतर चोरट्यांनी राणा यांच्या शेजारी राहणारे दिगांबर जुमडे यांच्या घराचे कुलूप तोडले. तेथून त्यांनी ४२ इंची कलर टीव्ही व रोख ५० हजार रुपये चोरून नेले.
दोन्ही घरांतून चोरट्यांनी ५.२० लाखांच्या मालावर डल्ला मारला. राणा यांच्या तक्रारीवरून वाठोडा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.