चोरट्याने पळविले अमेरिकन डॉलर
By Admin | Published: April 6, 2015 02:26 AM2015-04-06T02:26:01+5:302015-04-06T02:26:01+5:30
आझादहिंद एक्स्प्रेसने हावड्याला जात असलेल्या प्रवाशाचे दोन हजार अमेरिकन डॉलर पळविल्याप्रकरणी नागपूर लोहमार्ग
गुन्हा दाखल : आझादहिंद एक्स्प्रेसमधील घटना
नागपूर : आझादहिंद एक्स्प्रेसने हावड्याला जात असलेल्या प्रवाशाचे दोन हजार अमेरिकन डॉलर पळविल्याप्रकरणी नागपूर लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना अकोला ते बडनेरा दरम्यान सकाळी ७ च्या सुमारास घडली.
पुणे येथील रहिवासी डॉ. मुकुंद रामराव गायकवाड (७३) हे रेल्वेगाडी क्रमांक १२१२९ पुणे-हावडा आझादहिंद एक्स्प्रेसने (कोच बी-५, बर्थ ५७) पुणे ते हावडा असा प्रवास करीत होते. सकाळी ७ वाजताच्या दरम्यान अकोला ते बडनेरा दरम्यान ते गाढ झोपेत होते. त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन अज्ञात आरोपीने त्यांच्याजवळील दोन हजार अमेरिकन डॉलर पळविले. झोपेतून जागे झाल्यानंतर त्यांना आपले डॉलर दिसले नाही. डॉलर चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नागपूर रेल्वेस्थानकावर उतरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. चोरीला गेलेल्या अमेरिकन डॉलरची किंमत भारतीय चलनानुसार १ लाख २६ हजार ६६५ रुपये आहे. लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण अकोला लोहमार्ग पोलिसांकडे पाठविले आहे. रेल्वेगाडीच्या एसी कोचमध्ये ही घटना घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)