इतवारीत चोरांचा धुमाकूळ : चार दुकानात २.८५ लाखांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:03 AM2019-07-18T00:03:20+5:302019-07-18T00:05:49+5:30
चोरांनी मंगळवारी रात्री व्यावसायिक क्षेत्र इतवारीतील चार दुकानांमध्ये चोरी करून २.८५ लाख रुपये लंपास केले आहेत. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चोरांनी मंगळवारी रात्री व्यावसायिक क्षेत्र इतवारीतील चार दुकानांमध्ये चोरी करून २.८५ लाख रुपये लंपास केले आहेत. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
गांधीबाग बगीच्याजवळ हॅण्डलूम मार्केट आहे. माहितीनुसार रात्री सुमारे २.४० वाजता चोरांनी विनोद हुडिया यांची श्रीकृष्ण साडी शोरूम, गोपाल मुलतानी यांचे मिलिंद टेक्साटाईल्स, रमेश कुंगवानी यांचे पार्वती टेक्सटाईल्स आणि एका बंद दुकानात चोरी केली. चारही दुकाने जवळजवळ आहेत. हुडिया यांच्या दुकानातील कपाटामधून १.५० लाख, मुलतानी यांच्या दुकानातून १.३५ लाख आणि कुंगवानी यांच्या दुकानातून २५०० रुपये चोरीला गेले आहेत. चौथ्या दुकानात चोरांना काहीही मिळाले नाही.
सकाळी ५ वाजता मार्केटच्या चौकीदाराला दुकानाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी व्यापाºयांना सूचना दिली. त्यांनी दुकानात पोहोचून पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती होताच मार्केटमधील व्यापारी गोळा झाले. त्यांनी आरोपींना अटक करण्याची आणि परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी केली.
घटनेची माहिती मिळताच तहसील ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजयकुमार मालवीय घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीद्वारे आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. गांधीबाग निवासी परिसर आहे. या भागात रात्रीपर्यंत लोकांची ये-जा असते; शिवाय तहसील पोलीस ठाणे जवळच आहे. या भागात पोलिसांची गस्त असते. व्यापाºयांनी निगराणीसाठी चौकीदार नियुक्त केला आहे. अशास्थितीत चोरीची घटना आश्चर्यकारक आहे. पहाटे ३ पर्यंत सर्व दुकानांचे कुलूप लागले होते, असे चौकीदाराचे मत आहे. तर परिसरातील सीसीटीव्हीमध्ये रात्री २.४० वाजता एक संदिग्ध कार घटनास्थळी आल्याचे दिसून येत आहे. कार २.५८ वाजता रवाना झाली. तहसील पोलीस कारचा शोध घेत आहेत. पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली आहे.