चोरट्याने लंपास केले अमेरिकन डॉलर, दुबई अन् सिंगापूरची करन्सी
By दयानंद पाईकराव | Published: July 17, 2024 03:17 PM2024-07-17T15:17:56+5:302024-07-17T15:18:48+5:30
७.९९ लाखांचा मुद्देमाल चोरीला : शेअर मार्केट ट्रेडिंग व्यावसायिकाला फटका, कुटुंबीयांसह इंदूरला गेले होते लग्नाला
नागपूर : घराला कुलुप लावून कुटुंबीयांसह इंदूर येथे लग्नासाठी गेलेल्या शेअर ट्रेडिंगचा व्यावसायीकाच्या घरातील अमेरिकन डॉलर, दुबई आणि सिंगापूरची करन्सी व रोख ५० हजार असा ७ लाख ९९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात आरोपीने पळवून नेला. ही घटना गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत १५ जुलैला रात्री ९ ते १६ जुलैला सकाळी ८.१० वाजताच्या दरम्यान घडली.
संजय उर्फ गोपाल सत्यनारायण जोशी (६२, रा. जोशी भवन, घाट रोड) यांचा शेअर मार्केट ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. त्यांचा मुलगा अमेरिकेत राहतो. त्यामुळे अमेरिकेत ये-जा करण्यासाठी त्यांच्याजवळ २६०० डॉलर होते. सोबतच दुबई आणि सिंगापूरची करन्सी होती. ते आपल्या घराला कुलुप लाऊन इंदूर येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी गेले होते. दरम्यान अज्ञात आरोपीने त्यांच्या घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. आरोपीने बेडरुममधील लोखंडी आलमारीत ठेवलेले २६०० अमेरिकन डॉलर, दुबई व सिंगापूरची करन्सी व रोख ५० हजार रुपये असा एकुण ७ लाख ९९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. जोशी यांची मोलकरीण कामासाठी आली असता तिला घराचे कुलुप तुटलेले दिसले. तिने लगेच जोशी यांना घटनेची माहिती दिली. जोशी यांनी त्वरीत नियंत्रण कक्षाला फोन करून सूचना दिली. या प्रकरणी गणेशपेठ ठाण्याचे हवालदार सुरेश इंगळे यांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१ (४), ३०५ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.