चोरटे मानेना ! - पोलीस हतबल : घरफोड्यांची मालिका सुरूच
By admin | Published: April 20, 2015 02:07 AM2015-04-20T02:07:54+5:302015-04-20T02:07:54+5:30
शिरजोर झालेले चोरटे मानता मानायला तयार नाहीत. उपराजधानीत त्यांचा हैदोस सुरूच आहे.
नागपूर : शिरजोर झालेले चोरटे मानता मानायला तयार नाहीत. उपराजधानीत त्यांचा हैदोस सुरूच आहे. गेल्या २४ तासात त्यांनी पुन्हा चार ठिकाणी घरफोड्या करून लाखोंचा ऐवज लंपास केला. चार पैकी दोन गुन्हे प्रतापनगरातील आहे, हे येथे उल्लेखनीय!
भांगेविहार कॉलनीतील आशिष नीळकंठराव जाधव (वय ३१) यांच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ९५ हजारांचे दागिने लंपास केले. १६ एप्रिलला आशिष नीळकंठराव जाधव हे कामानिमित्त तर त्यांची आई देवदर्शनासाठी बाहेरगावी गेली होती. चोरट्यांनी १६ ते १७ एप्रिलच्या दरम्यान जाधव यांच्या दाराचा कडीकोंडा तोडला आणि ९५ हजारांचे दागिने लंपास केले.
दुसरी घटना श्रद्धानंदपेठ परिसरात घडली. राजेंद्र नामदेव देवासे (वय ४६) यांचा श्रद्धानंदपेठमध्ये फोटो स्टुडिओ आहे. शनिवारी सायंकाळी ६.३० ला त्यांनी स्टुडिओ बंद केला. रविवारी सकाळी १०.३० वाजता ते स्टुडिओ उघडण्यासाठी आले असता त्यांना शटरचे कुलूप तुटून दिसले. चोरट्यांनी आतमधून ८० हजार किंमतीचे दोन कॅमेरे चोरून नेले. देवासे यांच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला.
सुगतनगरातही मारला हात
सुगतनगरातील मीना राजेंद्र गावंडे (वय ५५) यांच्या घरातूनही चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि सिलिंडरसह ८० हजारांचा ऐवज चोरून नेला. गावंडे यांची मुलगी बेझनबागमध्ये राहाते. शनिवारी रात्री ११ वाजता त्या आपल्या मुलीच्या घरी गेल्या.
रविवारी सकाळी १० ला परतल्या तेव्हा ही घरफोडीची घटना उघडकीस आली. गावंडे यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
अशाच प्रकारे हुडकेश्वरमधील न्यू नरसाळा मार्गावर राहाणारे ईश्वर गणपतराव येवले (वय ५४) यांच्या दाराची पाटी तोडून चोरटे आतमध्ये शिरले आणि रोख ३५ हजार तसेच सोन्याचांदीचे दागिने असा एकूण ७६, ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. १७ एप्रिलला येवले आपल्या मुलीच्या घरी गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी हात मारला. रविवारी सकाळी ७ ला ही घरफोडी उघडकीस आली. हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. (प्रतिनिधी)