मेडिकलच्या १० ‘एसीं’वर चोरांचा डल्ला; कॉईल चोरी वाढली, ‘ट्रॉमा’नंतर आता मेडिकलमध्ये चोऱ्या
By सुमेध वाघमार | Published: February 27, 2024 07:46 PM2024-02-27T19:46:03+5:302024-02-27T19:46:25+5:30
मंगळवारी मेडिकलच्या शस्त्रक्रिया गृहात लावण्यात आलेल्या सहा ‘एसी’चे कॉईल चोरीला गेल्याचे पुढे आले.
नागपूर: मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमधील चार वातानुकुलीत यंत्रातील (एसी) तांब्याच्या कॉईल चोरीची घटना ताजी असताना आता मेडिकलच्या ‘एसी’चा कॉईलवरही चोरट्यांची नजर गेली आहे. मंगळवारी मेडिकलच्या शस्त्रक्रिया गृहात लावण्यात आलेल्या सहा ‘एसी’चे कॉईल चोरीला गेल्याचे पुढे आले. या महिन्यात जवळपास दहा एसींंवर चोरट्यांनी डल्ला मारल्याने रुग्णालयाच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) ट्रॉमा केअर सेंटरमध्ये अतिदक्षता विभागापासून ते शस्त्रक्रिया गृहात व वॉर्डातही ‘एसी’ लावण्यात आले आहे. परंतु त्याच्या देखरेखीकडे फारसे लक्ष नाही. यामुळे बहुसंख्य ‘एसी’ बंद आहेत. याचाच फायदा घेत या महिन्याच्या सुरूवातीला सलग तीन दिवस ‘ट्रामा’मधील ‘एसी’चे कॉईल चोरण्याची घटना घडली. मात्र मेडिकल प्रशासनाला याची माहिती घेऊन पोलिसांत तक्रार करण्यास बराच वेळ गेला. ही घटना ताजी असताना आता मेडिकलच्या सहावर ‘एसी’चे कॉईल चोरीला गेल्याची तक्रार आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर ‘एसी’ बंद पडल्याने रुग्णांसोबतच डॉक्टरांची गैरसोय होत आहे.
‘एसी’ बंद पडल्यावर चोरीची घटना उघडकीस
मेडिकलच्या शस्त्रक्रिया गृहातील ‘एसी’ बंद असल्याची तक्रार बांधकाम विभागाकडे आल्यावर त्यांनी तपासणी केली. त्यावेळी कॉईल चोरीला गेल्याचे उघडकीस आले. या घटनेची गंभीर दखल अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी घेतली. त्यांनी सुरेक्षेची जबाबदारी असलेल्या ‘महाराष्टÑ सुरक्षा बल’ाच्या जवानांची कानउघाडणी केल्याचे समजते.