नागपुरात  चोरट्यांची मद्यालयांवर वक्रदृष्टी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 12:57 AM2020-04-22T00:57:07+5:302020-04-22T00:58:28+5:30

मद्यालये बंद असल्यामुळे तळीरामांची अस्वस्थता टोकाला गेली आहे. दुसरीकडे चोरट्यांनी मद्यालयांवर वक्रदृष्टी फिरवली आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर दोन बीअर बारमध्ये चोरी झाली.

Thieves stare at liquor stores in Nagpur! | नागपुरात  चोरट्यांची मद्यालयांवर वक्रदृष्टी!

नागपुरात  चोरट्यांची मद्यालयांवर वक्रदृष्टी!

Next
ठळक मुद्देएकाच रात्रीतून दोन बार फोडले : लाखोंचे मद्य लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मद्यालये बंद असल्यामुळे तळीरामांची अस्वस्थता टोकाला गेली आहे. दुसरीकडे चोरट्यांनी मद्यालयांवर वक्रदृष्टी फिरवली आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर दोन बीअर बारमध्ये चोरी झाली. चोरट्यांनी बीअर बारमधून मोठ्या प्रमाणात विदेशी मद्य आणि काही रोख रक्कम पळवून नेली. आज सकाळी या दोन्ही घटना उघडकीस आल्या.
मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरेवाडा रिंग रोडवर सरकार बीअर बार आहे. या बीअर बारमध्ये सोमवारी मध्यरात्रीनंतर दोन चोरटे शिरले. त्यांनी बारच्या काउंटर आणि आजूबाजूला असलेल्या शोकेसमधून सुमारे ५० हजारांच्या विविध प्रकारच्या मद्याच्या बाटल्या चोरल्या. काउंटरमधील काही रक्कमही लंपास केली. बार मालकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.
इकडे या बार चोरीच्या घटनेचा तपास सुरुच व्हायचा असताना काही अंतरावरच कोराडी मार्गावरील विशाल बीअर बारमध्येही चोरी झाल्याचे पोलिसांना कळले. त्यामुळे पोलिसांचा ताफा तिकडे धावला. बारमालकाने दिलेल्या माहितीनुसार, बारच्या मागच्या बाजूला झाडेझुडपे असून त्या भागातील शटर उचकटून चोरटे बारमध्ये शिरले. त्यांनी बारमधील सुमारे एक ते दीड लाख रुपये किमतीच्या विदेशी मद्याच्या बाटल्या चोरून नेल्या. कोराडी पोलिसांनी याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केला.

घटना सीसीटीव्हीत कैद
सरकार बीअर बारमधील चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दोन चोरटे तोंडाला स्कार्फ बांधून आत शिरले आणि त्यांनी ही दारू चोरून नेल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. चोरट्यांनी हा गुन्हा उघड होऊ नये म्हणून बारच्या सीसीटीव्हीचा डी. व्ही. आर. ही तोडून चोरून नेला.

पोलिसांना वेगळाच संशय!
या चोरीच्या संबंधाने पोलीस चोहोबाजूने तपास करत आहेत. पोलिसांना दुसराही एक संशय आहे. सध्याची स्थिती लक्षात घेता चोरटे एकीकडे बार, वाईन शॉप फोडू लागले आहेत. तर, दुसरीकडे काही बारमालक आपल्या साथीदारांच्या माध्यमातून बारमधील दारू बाहेर काढूत विकत आहेत. त्यामुळे आम्ही दोन्ही अँगलने तपास करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Web Title: Thieves stare at liquor stores in Nagpur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.