नागपुरात चोरांनी उडवले १० लाखांचे दागिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 12:02 AM2019-08-03T00:02:27+5:302019-08-03T00:04:01+5:30
एका सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसह तिघांच्या घरी चोरांनी हात साफ करीत १० लाखाचे दागिने चोरून नेले. पहिली घटना मानकापूर पोलीस ठाण्यांतर्गत पीएनटी कॉलनीत घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसह तिघांच्या घरी चोरांनी हात साफ करीत १० लाखाचे दागिने चोरून नेले.
पहिली घटना मानकापूर पोलीस ठाण्यांतर्गत पीएनटी कॉलनीत घडली. प्लॉट नंबर ४५ येथील रहिवासी आनंदराव वानखेडे हे समाज कल्याण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी आहेत. त्यांची मुलगी मुंबईत राहते. वानखेडे २८ जुलै रोजी रात्री कुटुंबासह मुंबईला गेले होते. यादरम्यन अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आलमारीत ठेवलले हिरेजडित दागिने आणि ७६ हजार रुपयासह एकूण ७ लाखाचा माल चोरून नेला. वानखेडे यांच्या घरचा दरवाजा उघडा असल्याने शेजाऱ्यांना संशय आला. सुरुवातीला वानखेडे परत आले असावे असे वाटले, परंतु कुठलीही हालचाल होत नसल्याने त्यांनी फोन करून त्यांना माहिती दिली. वानखेडे यांनी नागपुरात पोहोचल्यावर पोलिसात तक्रार दाखल केली.
दुसरी घटना बेलतरोडी येथे घडली. येथील एका बंद घरातून चोरट्यांनी दीड लाखाचे दागिने चोरून नेले. उत्कर्ष हाऊसिंग सोसायटी येथील रहिवासी सरिता दिलीप पाटील या ३१ जुलै रोजी मुलासह हिंगण्याला गेल्या होत्या. दरम्यान चोरांनी त्यांच्या घरचे कुलूप तोडून दागिने लंपास केले. घरी परत आल्यावर त्यांना चोरी झाल्याचे समजले. बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याचप्रकारे न्यू सुभेदार ले-आऊट येथील प्रवीण नेरकर गुरुवारी रात्री कुटुंबासह घरी झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या किचनचे ग्रील तोडून आत प्रवेश केला. ७० हजार रुपयासह दीड लाखाचे सामान चोरून नेले. सक्करदरा पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.