अमेरिकन डॉलर्सवर हात मारणाऱ्या चोरट्यांना अटक
By योगेश पांडे | Published: July 29, 2024 03:37 PM2024-07-29T15:37:29+5:302024-07-29T15:38:50+5:30
योगेश पांडे - नागपूर लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक घर फोडून तेथून अमेरिकन डॉलर्ससह ...
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक घर फोडून तेथून अमेरिकन डॉलर्ससह ७.९९ लाखांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. यात एका अल्पवयीन मुलासह तिघांचा समावेश आहे. गुन्हेशाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने ही कारवाई केली.
१५ जुलै रोजी रात्री संजय उर्फ गोपाल सत्यनारायण जोशी (६२, जोशीभवन, घाटरोड) हे घराला कुलूप लावून इंदोरा येथे नातेवाईकाच्या लग्नाला गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातून अमेरिकन डॉलर्स, दुबई व सिंगापुरची करन्सी, रोख ५० हजार व दागिने असा ७.९९ लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. समांतर तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाला खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून तसेच तांत्रिक आरोपींचा सुगावा लागला. पोलिसांनी शाहरूख खान उर्फ हनीफ खान (२३, ज्योतीनगर, खदान, तहसील) याला ताब्यात घेतले. त्याने त्याचा साथीदार क्षितीज चौकसे (बुद्धनगर, पाचपावली) व एका अल्पवयीन मुलासोबत घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याची सखोल चौकशी केली असता आरोपींनी नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याचीदेखील कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून परदेशी चलन, दुचाकी, सोन्याची चेन असा ३.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. क्षितीज चौकसे हा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद ठाकरे, नवनाथ देवकाते, ईश्वर खोरडे, मिलींद चौधरी, मुकेश राऊत, प्रवीण लांडे, अमोल जासुद, विनोद गायकवाड,अनुप तायवाडे, संतोष चौधरी, प्रविण रामटेके, अनिल बोटरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.