प्राण्यांचा नाही माणसांचाही विचार करा

By admin | Published: July 30, 2015 03:26 AM2015-07-30T03:26:13+5:302015-07-30T03:26:13+5:30

सातव्या क्रमांकाच्या नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मनसर ते खवासापर्यंतच्या रोडचे चौपदरीकरण ...

Think of animals as well as humans | प्राण्यांचा नाही माणसांचाही विचार करा

प्राण्यांचा नाही माणसांचाही विचार करा

Next

हायकोर्टाने सुनावले : सृष्टी पर्यावरण संस्थेचा अर्ज फेटाळला
नागपूर : सातव्या क्रमांकाच्या नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मनसर ते खवासापर्यंतच्या रोडचे चौपदरीकरण करण्यासाठी झाडे कापण्यास विरोध करणाऱ्या सृष्टी पर्यावरण संस्थेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी कडक शब्दांत सुनावले. तसेच, याप्रकरणात संस्थेने दाखल केलेला मध्यस्थी अर्ज फे टाळून लावला.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांच्यासमक्ष सुनावणी झाली. संस्थेला सुनावताना न्यायालय म्हणाले, तुम्ही केवळ पर्यावरण व प्राण्यांचा विचार करता, माणसांना होणाऱ्या त्रासाशी तुम्हाला काहीच देणेघेणे नाही. पर्यावरण व प्राणी संवर्धन आवश्यक आहेच पण, त्यासोबत विकासही गरजेचा आहे. मनसर ते खवासा या ३७ किलोमीटर रोडचे चौपदरीकरण थांबवून ७८ किलोमीटर लांब बायपासने वाहने नेणे चुकीचे होईल. या रोडने रोज आठ हजारावर वाहने जातात. ही वाहने बायपासने नेल्यास वर्षाला लाखो लीटर डिझेल आगाऊ लागेल. एवढे डिझेल जळून पर्यावरणाची जी हानी होईल ती या रोडवरील झाडे कापण्यापेक्षाही भयंकर असेल असे मत न्यायालयाने व्यक्त केले.
न्यायालयाने मनसर-खवासा रोडवरील झाडे कापण्याचे आदेश दिल्यानंतर सृष्टी पर्यावरण संस्थेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना योग्य न्यायालयात दाद मागण्याची सूचना करून दिलासा देण्यास नकार दिला होता.
यानंतर संस्थेने राष्ट्रीय हरित लवादात अर्ज दाखल केला. तसेच, उच्च न्यायालयात संस्थेचा मध्यस्थी अर्ज प्रलंबित होता. यामुळे उच्च न्यायालयाने संस्थेला याप्रकरणात बाजू मांडण्यासाठी हरित लवादातील अर्ज मागे घेण्याची सूचना केली होती. तसेच, एकाचवेळी दोन्ही ठिकाणी अर्ज चालवता येणार नसल्याची समज दिली होती. परंतु, संस्थेने हरित लवादातील अर्ज मागे घेण्यास नकार दिला.
यामुळे उच्च न्यायालयाने संस्थेचा याप्रकरणातील मध्यस्थी अर्ज फेटाळून लावला.
या रोडवरील झाडे कापण्यास वन विभागाकडून परवानगी देण्यात येत नव्हती. यामुळे रोडच्या चौपदरीकरणाचे काम रखडले. रोड अत्यंत खराब झाला आहे. वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अपघात होत आहेत. उच्च न्यायालयाने यासंदर्भातील वृत्ताची स्वत:हून दखल घेऊन जनहित याचिका दाखल केली आहे. अ‍ॅड. निखिल पाध्ये न्यायालय मित्र असून महामार्ग प्राधिकरणतर्फे अ‍ॅड. ए. एम. घारे व अ‍ॅड. अनीश कठाणे, सृष्टी संस्थेतर्फे अ‍ॅड. तुषार मंडलेकर तर, अन्य मध्यस्थातर्फे अ‍ॅड. मोहित खजांची यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)
किती दिवसांत झाडे कापता
मनसर-खवासा सोडवरील वनपरिक्षेत्रातील झाडे किती दिवसांत कापता अशी विचारणा उच्च न्यायालयाने करून यावर वन विभागाला गुरुवारी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. वनपरिक्षेत्राबाहेरील झाडे महामार्ग प्राधिकरण कापणार आहे. प्राधिकरणला झाडे कापण्याची परवानगी मिळाली आहे. वन विभागाने झाडे कापण्यासाठी चार महिन्यांचा वेळ मागितला होता. परंतु, न्यायालयाने १५ दिवसांपेक्षा अधिक वेळ देण्यास नकार दिला आहे. यामुळे वन विभागाला किती दिवसांत झाडे कापण्यात येईल यावर उत्तर द्यायचे आहे. झाडे कापण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री देण्याची महामार्ग प्राधिकरणने तयारी दर्शविली आहे.

Web Title: Think of animals as well as humans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.