जातीविरहित समाजाचा विचार करा : सुशीलकुमार शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 11:16 PM2019-01-04T23:16:06+5:302019-01-04T23:18:46+5:30
जातीपातीमुळे समाज विखुरला जाऊन विचार संकुचित होत आहेत. जे हाताच्या रेषेवर अवलंबून आहेत, ते जीवनात काहीही करू शकत नाही. तरुणांनो मूठ उघडा, स्वत:चे आयुष्य स्वत:च घडवा. त्याकरिता कष्ट आणि धडपड करण्याची तयारी ठेवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना जातीविहरित समाजाचा केलेल्या विचारांचा अवलंब तरुणांना करण्याचे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जातीपातीमुळे समाज विखुरला जाऊन विचार संकुचित होत आहेत. जे हाताच्या रेषेवर अवलंबून आहेत, ते जीवनात काहीही करू शकत नाही. तरुणांनो मूठ उघडा, स्वत:चे आयुष्य स्वत:च घडवा. त्याकरिता कष्ट आणि धडपड करण्याची तयारी ठेवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना जातीविहरित समाजाचा केलेल्या विचारांचा अवलंब तरुणांना करण्याचे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे केले.
मारवाडी फाऊंडेशनच्यावतीने वर्ष २००८ पासून देण्यात येणारा यंदाचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार शिक्षणतज्ज्ञ आणि यूजीसीचे माजी चेअरमन डॉ. सुखदेव थोरात यांना देण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्यात आले. या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी डॉ. जोगेंद्र कवाडे, पुरस्काराचे मानकरी यूजीसीचे माजी चेअरमन डॉ. सुखदेव थोरात, नागपूर विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, मारवाडी फाऊंडेशनचे गिरीश गांधी, अतुल कोटेचा, महेश पुरोहित, विजय मुरारका, गोविंद अग्रवाल, डी.आर. मल, सुधीर बाहेती उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, मारवाडी समाज दिलदार असून फाऊंडेशनने बाबासाहेबांच्या नावाने सुरू केलेला पुरस्कार देशात एकमेव आहे. ते म्हणाले, देशात बाबासाहेबांचा विचार गाडून टाकण्याचे काम करीत आहे. हिंदुत्ववाद, दलितवाद आणि अल्पसंख्याक वादावर भूमिका मांडण्याचे काम देशात सुरू आहे. त्यामुळे तरुणांना आता स्वतंत्र विचारसरणीची गरज आहे. आर्थिक आणि शैक्षणिक समतेची जाण असलेले थोरात यांना हा पुरस्कार देऊन फाऊंडेशनने मोठे काम केले आहे. समाजाचे विचार कसे बदलेल, हा उपदेश तरुणांनी थोरात यांच्याकडून घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
जोगेंद्र कवाडे म्हणाले, देशात संतांनाही जातीच्या कोंडवाड्यात टाकण्याचे काम होत आहे. हे दुर्दैव आहे. हे सर्व कोंडवाडे तोडण्याचे काम मारवाडी फाऊंडेशन करीत आहे.
निंबाळकर म्हणाले, सामाजिक एकता निर्माण करणाऱ्या उल्लेखनीय कार्यासाठी थोरात यांची पुरस्कारासाठी केलेली निवड योग्य आहे. समाजात बाबासाहेबांचे विचार रुजविण्याची गरज आहे. देशातील सर्व देवस्थानातील संपत्ती गावांच्या विकासासाठी खर्च करावी. सामाजिक बंधनातून जाती सोडविल्या पाहिजे. शेतकरी गरीब असून त्यांच्या उत्थानासाठी देशात आर्थिक कृषी क्रांती व्हावी, असे त्यांनी ठासून सांगितले.
सत्काराला उत्तर देताना थोरात म्हणाले, सत्ता हातात असताना राजकारण आणि अर्थकारणाचे निर्णय घेणे सोपे असते. पण समाज सुधारणेचे काम कठीण आहे. हे कार्य फार कमी लोक करतात. अस्पृशतेचा कायदा आहे, पण तो दिसत नाही. आपण नेहमीच धोरणावर भर दिला. शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती सुधारल्यास जाती व्यवस्था सुधारते. मारवाडी फाऊंडेशन सामाजिक परिवर्तनाचे कार्य खरोखरंच प्रशंसनीय आहे.
प्रास्तविक करताना गांधी म्हणाले, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांचे मूल्य जपताना फाऊंडेशन समाजाला जोडून राष्ट्रीय एकात्मतेचे काम करीत आहे. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेबांची विभागणी जातीच्या आधारावर करू नये.
संचालन ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी यांनी तर सुधीर बाहेती यांनी आभार मानले.
कार्यक्रमात विमल थोरात, विजय जावंघिया, डॉ. पूरण मेश्राम, अनंत घारड, सत्यनारायण नुवाल, प्रवीण तापडिया, रमेश रांदड, सुरेश राठी, रमेश बोरकुटे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.