घटस्फोटित मायबापहो मुलांचा विचार करा!
By admin | Published: May 30, 2016 02:09 AM2016-05-30T02:09:03+5:302016-05-30T02:09:03+5:30
भारतात विविध कारणांनी घटस्फोट होतात आणि घटस्फोट झालेले दाम्पत्य अहंकारामुळे एकमेकांचे तोंड पाहण्यासही तयार होत नाहीत.
भांडणाचा होतो वाईट परिणाम : हायकोर्टातील प्रकरणामुळे पुढे आली समस्या
राकेश घानोडे नागपूर
भारतात विविध कारणांनी घटस्फोट होतात आणि घटस्फोट झालेले दाम्पत्य अहंकारामुळे एकमेकांचे तोंड पाहण्यासही तयार होत नाहीत. अशावेळी खरा प्रश्न निर्माण होतो, तो त्यांच्या मुलांच्या भविष्याचा. दोघांनीही सकारात्मक भूमिका ठेवली नाही तर, मुले अंध:कारात ढकलली जातात. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात असेच एक प्रकरण दाखल झाले होते. यातील घटस्फोटित दाम्पत्याच्या मुलीचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले होते. न्यायालयाने या प्रकरणावर नुकताच अंतिम निर्णय दिला असून, त्यात मुलीच्या शिक्षणाचा प्राधान्याने विचार करण्यात आला.
प्रकरणातील घटस्फोटित दाम्पत्य सूरज (नागपूर) व कविता (भंडारा) यांना गार्गी नामक एकमेव कन्या असून, ती सध्या नाशिक येथील एका प्रसिद्ध निवासी शाळेत शिक्षण घेत आहे (तिन्ही नावे काल्पनिक). सूरजने गार्गीला नाशिक येथील निवासी शाळेत टाकण्याची परवानगी मिळण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज सादर केला होता. त्यावेळी कविताने यास विरोध केला नव्हता. यामुळे ९ मे २०१४ रोजी कौटुंबिक न्यायालयाने सूरजचा अर्ज मंजूर केला. यानंतर सूरजने कविताकडून गार्गीचा ताबा घेतला व तिला ६ जून २०१४ रोजी शाळेत टाकले. दरम्यान, कविताने अचानक कौटुंबिक न्यायालयात अर्ज सादर करून गार्गीचा ताबा मिळण्याची विनंती केली. सूरज गार्गीला बळजबरीने घेऊन गेल्याचा दावा तिने केला. सूरजने यावर वेळेवर उत्तर न दिल्यामुळे कौटुंबिक न्यायालयाने गार्गीचा ताबा कविताकडे देण्याचा आदेश दिला, तसेच निवासी शाळेला तसे कळविण्यास सांगितले. परिणामी गार्गीच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. सूरजने या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने गार्गीचे शैक्षणिक भविष्य लक्षात घेऊन वादग्रस्त आदेश रद्द केला व प्रकरण कायद्यानुसार नव्याने निर्णय घेण्यासाठी कौटुंबिक न्यायालयाकडे परत पाठविले. मात्र या प्रकरणामुळे घटस्फोटित दाम्पत्यांच्या मुलांचे भवितव्य कसे असुरक्षित असते हे समाजापुढे आले.
न्यायमूर्तींनी घेतली मुलीची भेट
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी या प्रकरणावर निर्णय दिला. त्यापूर्वी त्यांनी चेंबरमध्ये गार्गीची व्यक्तिश: भेट घेतली. गार्गीसोबत काही वेळ संवाद साधल्यानंतर ती बुद्धीने अत्यंत हुशार व चपळ असल्याचे न्यायमूर्तींना दिसून आले. परिणामी, न्यायालयाने चांगले शिक्षण मिळाल्यास गार्गीचे भविष्य उज्ज्वल असल्याचे निर्णयात नमूद केले. तसेच आई-वडिलांच्या भांडणामुळे तिच्या शैक्षणिक जीवनावर वाईट परिणाम पडत असल्याचे निरीक्षण नोंदविले.
कौटुंबिक न्यायालयावर नाराजी
कौटुंबिक न्यायालयाने या प्रकरणात अत्यंत घाईने निर्णय दिल्यामुळे उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. कविताच्या अर्जात केवळ गार्गीचा ताबा देण्याची विनंती करण्यात आली होती. यामुळे गार्गी सूरजच्या ताब्यात आहे का, हे प्रथम निश्चित करायला हवे होते आणि उत्तर नकारार्थी मिळाल्यास गार्गीला निवासी शाळेतून काढल्यास तिच्या शैक्षणिक भविष्य व वैयक्तिक जीवनावर वाईट परिणाम होईल काय, याचा विचार करायला हवा होता. परंतु यावर विचारच करण्यात आला नाही, असा निष्कर्ष उच्च न्यायालयाने नोंदविला.