कंत्राटदार पाटील कुटुंबीयांवर तिसरा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:13 AM2021-08-25T04:13:15+5:302021-08-25T04:13:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कामे पूर्ण झाली नसताना अतिरिक्त सुरक्षा ठेव म्हणून जमा केलेली रक्कम परस्पर काढून घेतल्याच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामे पूर्ण झाली नसताना अतिरिक्त सुरक्षा ठेव म्हणून जमा केलेली रक्कम परस्पर काढून घेतल्याच्या आरोपावरून कंत्राटदार रोशन पंजाबराव पाटील आणि त्यांच्या नातेवाइकांवर सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे, महिनाभराच्या कालावधीत पाटील कुटुंबीयांवर दाखल झालेला हा तिसरा गुन्हा होय.
जिल्हा परिषद नागपूरच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कार्यरत कार्यकारी अभियंता संजीव बलवंत हेमके (वय ५५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी रोशन पाटील (वय ३५), कांचन पाटील (३०) तसेच त्यांचे वडील पंजाबराव पाटील (६५, रा. काटोल) यांनी मे. नाना कन्ट्रक्शन्स या संस्थेच्या माध्यमातून जि.प.च्या पाणीपुरवठा विभागाचे ऑनलाइन टेंडर भरून नऊ कामं मिळवली. १२ डिसेंबर २०१७ ते २५ मे २०२१ या कालावधीत कंत्राटानुसार काम पूर्ण झाली नसताना आणि कामांचा दोष निवारण कालावधी पूर्ण झाला नसताना आधी जमा केलेली मुदत ठेव तसेच अतिरिक्त सुरक्षा मुदत ठेवेची १३, ४०, ५०० रुपयांची रक्कम पाटील कुटुंबीयांनी परस्पर काढून घेतली. ही रक्कम उचलताना त्यांनी संबंधित कार्यालयाची परवानगी घेतली नाही. त्यामुळे पाटील यांची ही कृती जिल्हा परिषद नागपूर आणि महाराष्ट्र शासन यांची फसवणूक करणारी आहे, असे हेमके यांच्या तक्रारीत नमूद आहे. त्याची चाैकशी करून सदर पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला. एकाच स्वरूपाच्या तीन तक्रारीवरून महिनाभरात पाटील यांच्या विरोधात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.
----