भू-माफिया बग्गा टोळीविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:25 AM2020-12-11T04:25:33+5:302020-12-11T04:25:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भूमाफिया बग्गा-सहारे टोळीतर्फे बोगस दस्तावेजाच्या माध्यमातून फसवणूक केल्याचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भूमाफिया बग्गा-सहारे टोळीतर्फे बोगस दस्तावेजाच्या माध्यमातून फसवणूक केल्याचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. प्रतापनगर पोलिसांनी गौरव सिंह बग्गा, त्याचा सासरा अशोक हरुमल खट्टर, प्रशांत शिवकुमार सहारे आणि गुरप्रित सिंह जसबीर सिंह रेणू यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. बग्गाविरुद्ध एका महिन्यात हा तिसरा गुन्हा दाखल झाल्याने त्याच्या संरक्षणकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
बग्गा त्याचा सासरा व इतर दोन्ही आरोपीविरुद्ध यापूर्वी ३ नोव्हेंबर रोजी वाठोडा पोलीस ठाण्यात फळ विक्रेते तवरलाल छाबरानी यांची फसवणूक तथा खंडणी वसुली केल्याचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात अशोक खट्टर याला अटक करण्यात आली होती. तो न्यायिक कोठडी अंतर्गत तुरुंगात आहे. दरम्यान उपरोक्त ताजे प्रकरण समोर आले. या प्रकरणातील तक्रारकर्ता विशाल भजनकर आहे. विशालचे वडील कळमना बाजारात दलाल होते. बग्गा आणि सहारेने विशालला सांगितले की, त्याच्या वडिलांनी त्यांना १९९२ मध्ये प्लॉट विकला होता. त्याच्या चतुर्सीमेत फेरफार करायचे असल्याने उपनिबंधक कार्यालयात बोलावले.
बग्गा व सहारेने विशालला बोगस शपथपत्र व कब्जा पत्र दाखवून चतुर्सीमेत फेरफार करायचे असल्याचे सांगितले. तो २७ ऑक्टोबर रोजी विशालला कोतवालनगर येथील दुय्यम उपनिबंधक कार्यालयात घेऊन गेला. तिथे दस्तावेजावर त्याला स्वाक्षरी करण्यास सांगितले. विशालने जेव्हा दस्तावेज वाचण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला संशय आला. विशालने स्वाक्षरी करण्यास विरोध केला. तेव्हा आरोपी त्याला घेऊन कार्यालयाबाहेर आले. विशाल आणि त्याच्या आईला एक लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून शांत राहण्यास सांगितले आणि दिघोरी येथील प्लॉटची रजिस्ट्री केली. आज गुरुवारी विशालने प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणूक व गुन्हेगारी षड्यंत्र केल्याचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.