तिसऱ्या दिवशीही कोल्ड स्टोअरेजची आग कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 08:33 PM2019-04-17T20:33:05+5:302019-04-17T20:34:53+5:30
भंडारा मार्गावरील कापसी-महालगाव परिसरात असलेल्या सुरुची मसालेच्या पाच मजली कोल्ड स्टोअरेजला सोमवारी दुपारी १.५० च्या सुमारास लागलेली आग बुधवारी तिसऱ्या दिवशीही धुमसत आहे. कोल्ड स्टोअरेजच्या पाचव्या मजल्याला लागलेली आग चौथ्या व तिसऱ्या मजल्यापर्यंत आली आहे. आगीमुळे बांधकामासाठी वापरण्यात आलेले स्टील व लोखंड वितळत असल्याने इमारत धोकादायक झाली आहे. ती कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारी बाजूच्या दुसऱ्या गोदामात पोहोचलेली आग आटोक्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भंडारा मार्गावरील कापसी-महालगाव परिसरात असलेल्या सुरुची मसालेच्या पाच मजली कोल्ड स्टोअरेजला सोमवारी दुपारी १.५० च्या सुमारास लागलेली आग बुधवारी तिसऱ्या दिवशीही धुमसत आहे. कोल्ड स्टोअरेजच्या पाचव्या मजल्याला लागलेली आग चौथ्या व तिसऱ्या मजल्यापर्यंत आली आहे. आगीमुळे बांधकामासाठी वापरण्यात आलेले स्टील व लोखंड वितळत असल्याने इमारत धोकादायक झाली आहे. ती कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारी बाजूच्या दुसऱ्या गोदामात पोहोचलेली आग आटोक्यात आली आहे.
कापसी खुर्द येथील सुरुचीचे हे स्टोअरेज महामार्गाला लागून आहे. १.४ एकर परिसरात हे विस्तारले असून, पहिल्या पाच माळ्याच्या स्टोअरेजमध्ये हजारो मिरची पोती भरून ठेवली होती. पाचव्या, चौथ्या व तिसऱ्या माळ्यांपर्यंत ही आग पसरली आहे तर, दुसरे स्टोअरेज चार माळ्यांचे आहे. येथे मंगळवारी आग पसरली होती. आगीत आतमध्ये असलेल्या मसाले बनविण्यासाठीची सर्व सामग्रीची पोती जळाली. बुधवारी ही आग आटोक्यात आली आहे. मात्र पाच माळ्यांच्या स्टोअरेजमधील आग आटोक्यात येणे शक्य नाही. ती आणखी काही दिवस राहील. ही इमारत धोकादायक झाली आहे. आग आटोक्यात आल्यानंतर इमारत पडली नाही तरी तिचा वापर धोकादायक असल्याने ती जमीनदोस्त करावी लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दुसऱ्या कोल्ड स्टोअरेजच्या इमारतीत आग विझविताना मंगळवारी वाहनचालक डी. बी. बिनीकर, आर. डी. पवार, योगेश खोडके आणि रोशन कावळे हे चार जण जखमी झाले. या सर्वांना तातडीने पारडी भागातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील बिनीकर यांच्या हाताची कातडी भाजल्याने त्यांना क्रिम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
फायर फायटिंगची यंत्रणा नाही
पाच मजली कोल्ड स्टोअरेज उभारताना येथे करण्यात येणारा मालाचा साठा विचारात घेता सुरक्षेच्या दृष्टीने इमारतीत फायर फायटिंग, पाण्याचा मारा करण्यासाठी स्प्रिंकलर्स बसविणे आवश्यक होते. ही यंत्रणा असती तर स्टोअरेजला लागलेली आग वेळीच आटोक्यात आणणे शक्य झाले असते. परंतु स्टोअरेज मालकांनी याकडे दुर्लक्ष केल्याने आग आटोक्यात आणता आली नाही. आता ती शक्य नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
धोकादायक इमारतीच्या यादीत
अग्निशमन विभागातर्फे १ सप्टेंबर २०१४ रोजी या परिसराची तपासणी करण्यात आली होती. यात इमारतीत आगप्रतिबंधक यंत्रणा नसल्याने, त्यावेळी स्टोअरेज मालकाला नोटीस बजावण्यात आली होती. यासाठी २६ सप्टेंबरपर्यंतची वेळ देण्यात आली होती. नोटीसकडे दुर्लक्ष केल्यानेच ही इमारत धोकादायक म्हणून जाहीर केली होती. विभागाने यासंदर्भात नागपूर महानगर विकास प्राधिकरण व कापसी खुर्द पंचायत समितीलाही कळविले होते. यात पाणी व वीज तोडावी, अशी सूचना केली होती. तर, विभागाने दिलेल्या नोटीसला स्टोअरेज मालकाने न्यायालयात आव्हान देऊन स्थगनादेश मिळविला. प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने अग्निशमन विभागाला कारवाई करता आलेली नाही
१५ लाख लिटर पाण्याचा मारा
सध्या घटनास्थळी कळमना व सक्करदरा येथील चार बंबांसह टीटीएलतर्फे पाण्याचा मारा करण्यात येत आहे. स्टोरेज परिसरात हायड्रंन्ट असल्याने आग विझविण्यास लागत असलेले पाणी उपलब्ध आहे. किमान दोन लाख लिटर पाणी क्षमता येथे आहे. तसेच आसपासच्या परिसरातूनही पाणी उपलब्ध असल्याने इमारतीवर सातत्याने पाण्याचा मारा करण्यात येत आहे. तीन दिवसात १५ लाख लीटरहून अधिक पाण्याचा मारा करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके आग नियंत्रणाच्या प्रयत्नात असून बुधवारी अग्निशमन विभागाचे उपमुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे व विभागाचे अधिकारी व कर्मचारी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत होते.