विदर्भाला तिसऱ्या उष्ण लाटेचा तडाखा; ४४ डिग्रीने अकाेलेकर हाेरपळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2022 09:06 PM2022-04-06T21:06:16+5:302022-04-06T21:07:43+5:30
Nagpur News हवामान विभागाने लागाेपाठ तिसऱ्या उष्ण लहरींचा इशारा दिला आहे. जाणकारांच्या मते मागील शतकभरात असा प्रकार बघायला मिळाला नसून २० दिवसांपासून सुरू असलेल्या सूर्याच्या प्रकाेपाने नवीन विक्रम केला आहे.
नागपूर : विदर्भावर हाेत असलेला उष्ण लाटांचा प्रकाेप थांबायला तयार नाही. १५ मार्चपासून सुरू झालेले उष्ण लाटांचे सत्र आजतागायेत कायम आहे. हवामान विभागाने लागाेपाठ तिसऱ्या उष्ण लहरींचा इशारा दिला आहे. जाणकारांच्या मते मागील शतकभरात असा प्रकार बघायला मिळाला नसून २० दिवसांपासून सुरू असलेल्या सूर्याच्या प्रकाेपाने नवीन विक्रम केला आहे.
विदर्भातील अकाेलेकरांची हाेरपळ थांबायला तयार नाही. अकाेल्याचे तापमान सातत्याने नवीन उच्चांक गाठत आहे. २७ मार्चपासून ४३ अंशांवर गेलेला शहराचा पारा उतरण्याऐवजी अजूनच वाढत चालला आहे. ४ एप्रिलला ४४ अंशावर धडक दिल्यानंतर मंगळवार ५ एप्रिलला ४४.२ अंशांवर पाेहोचत जगभरातील उष्ण शहरांच्या यादीत पहिला क्रमांक गाठला. बुधवारी अकाेल्याचे तापमान ४४ अंशांवर हाेते. दुसरीकडे अमरावतीचे तापमान सरासरीपेक्षा ३.८ अंशांनी वाढून ४३.२ अंशांवर पाेहोचले. त्याखालाेखाल चंद्रपूर ४२.६ अंश, वर्धा ४२.२ अंश, गाेंदिया, वाशिम ४१.५ अंश, बुलढाणा ४१ तर नागपूर व यवतमाळ ४०.९ अंशांवर आहे. हवामान विभागाने १० एप्रिलपर्यंत अकाेलेकर उष्णतेच्या लाटेने हाेरपळतील, असा इशारा दिला आहे.
यावर्षी मार्च महिन्यात १५ तारखेला उष्णतेची पहिली लाट आली, जी २३ मार्चपर्यंत चालली. त्यानंतर २६ मार्चपासून दुसरी लाट सुरू झाली, जी अद्याप सुरू आहे. नागपूरसह काही जिल्ह्यात एक दिवसाचा दिलासा मिळाला आणि ५ एप्रिलपासून पुन्हा पाऱ्याने उसळी घेतली. अकाेला मात्र १० दिवसांपासून हाेरपळत असून पुन्हा पाच दिवस तडाखा राहणार आहे.
मागील १०० वर्षांत मार्चमध्ये दाेनदा उष्णतेच्या लाटा आल्या नाहीत. त्यालागाेपाठही आल्या नाहीत आणि एवढे दिवस चालल्या नाहीत. मागील दशकभरात उष्ण दिवसांमध्ये वाढ हाेण्याचा प्रकार वाढला आहे व पुढेही वाढत जाणार आहे. विशेष म्हणजे भारतात पहिल्यांदाच उष्णतेचा प्रकाेप सर्वत्र दिसून येत आहे. मानवाच्या दृष्टीने हा हवामानाचा अतिशय धाेकादायक इशारा आहे.
- प्रा. सुरेश चाेपणे, हवामान अभ्यासक