नागपुरात बुधवारपासून सुरू होणार तिसरे कारागृह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 11:49 PM2020-06-16T23:49:32+5:302020-06-16T23:51:11+5:30
कारागृहातील लॉकडाऊनच्या पाश्र्वभूमीवर नागपुरात बुधवारपासून तिसरे कारागृह सुरू होणार आहे. अजनी चौकातील माऊंट कारमेल शाळेत हे तात्पुरते कारागृह सुरू केले जाणार असून बुधवारपासून तेथे नवीन कैद्यांना ठेवले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कारागृहातील लॉकडाऊनच्या पाश्र्वभूमीवर नागपुरात बुधवारपासून तिसरे कारागृह सुरू होणार आहे. अजनी चौकातील माऊंट कारमेल शाळेत हे तात्पुरते कारागृह सुरू केले जाणार असून बुधवारपासून तेथे नवीन कैद्यांना ठेवले जाणार आहे.
कारागृहात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सरकारने अनेक ठिकाणी पर्यायी कारागृहांची व्यवस्था केली. त्यानुसार नागपुरात मध्यवर्ती कारागृहाच्या बाजूला असलेल्या मंगलम लॉन सभागृहात महिनाभरापूर्वी दुसरे कारागृह सुरू करण्यात आले होते. मात्र या सभागृहाची आणि तेथील खोल्यांची क्षमता लक्षात घेता आता जास्त कैदी तेथे राहू शकत नसल्याने नवीन कैद्यांना कुठे ठेवायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे कारागृहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी तिसऱ्या कारागृहासाठी पर्यायी व्यवस्था करून देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. कारागृहाच्या बाजूच्याच अजनी चौकात माउंट कारमेल शाळा आहे. सध्या शाळांना सुट्टी असल्यामुळे या शाळेत अस्थायी स्वरूपाचे कारागृह सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली होती. ती जिल्हा प्रशासनाकडून सोमवारी मंजूर करण्यात आली. त्यामुळे मंगळवारी दिवसभर शाळेत कारागृह प्रशासनाने आवश्यक त्या सोयीसुविधा निर्माण केल्या. बुधवारी हे तात्पुरते कारागृह सुरू केले जाणार आहे.
दीडशे कैदी ठेवणार
या तात्पुरत्या नवीन कारागृहात दीडशे कैदी राहतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे संख्याबळ ५० च्या घरात राहील, अशी माहिती कारागृह अधीक्षक कुमरे यांनी दिली.