साडेतीन नंबरचा चष्मा झाला ‘मायनस’

By admin | Published: May 17, 2017 02:26 AM2017-05-17T02:26:18+5:302017-05-17T02:26:18+5:30

लहानपणापासून साडेतीन नंबरचा चष्मा वापरणाऱ्या एका २५ वर्षीय युवकाला त्याच्या जाड भिंगाच्या चष्म्यातून मुक्ती मिळाली.

The third number of specs is minus | साडेतीन नंबरचा चष्मा झाला ‘मायनस’

साडेतीन नंबरचा चष्मा झाला ‘मायनस’

Next

मेडिकल : ‘लॅसिक लेझर’वर पहिली शस्त्रक्रिया यशस्वी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लहानपणापासून साडेतीन नंबरचा चष्मा वापरणाऱ्या एका २५ वर्षीय युवकाला त्याच्या जाड भिंगाच्या चष्म्यातून मुक्ती मिळाली. कुठलाही चिरा नाही, रक्त नाही, वेदनारहित ही शस्त्रक्रिया अर्ध्या तासात आटोपून तो घरीही गेला. ही किमया घडली नागपूर मेडिकलच्या नेत्ररोग विभागात उपलब्ध झालेल्या चार कोटी रुपयांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान ‘लॅसिक लेझर’ उपकरणामुळे.
लहानांपासून ते वयोवृद्धांना दूरचे किंवा जवळचे नीट दिसत नसेल, मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतरही अंधुक दिसत असेल, जाड चष्माच्या भिंगामुळे लग्न जुळत नसेल किंवा नोकरीत अडचण जात असेल अशा सर्वांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने उपचार करण्यासाठी ‘लॅसिक लेझर’ उपकरण महत्त्वाचे ठरते. राज्यात हे उपकरण केवळ मुंबईच्या शासकीय रुग्णालय जे.जे. येथेच आहे. परंतु खासगी इस्पितळात या शस्त्रक्रियेचा खर्च व मुंबईच्या शासकीय रुग्णालयात सामान्यांना जाणे-येणे करून उपचार घेण्याचा खर्च परडवणारे नसल्याने या उपकरणासाठी मेडिकलच्या नेत्ररोग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अशोक मदान यांनी पुढाकार घेतला. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी याचा पाठपुरावा केल्याने चार कोटींचे हे उपकरण मेडिकलमध्ये स्थापन झाले. १३ मे रोजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. मंगळवारी या उपकरणावर पहिली शस्त्रक्रिया नागपूरच्या एका २५ वर्षीय युवकावर यशस्वी पार पडली. या पहिल्या शस्त्रक्रियेला घेऊन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी नेत्ररोग विभागाचे प्रमुख डॉ. अशोक मदान यांच्यासह सर्व चमूचे कौतुक केले. डॉ. मदान यांनी ‘लोकमत’ला सांगितले, या युवकाला लहानपणापासून नंबरचा चष्मा लागला होता. तो वाढत जाऊन एका डोळ्याचा नंबर तीन तर दुसऱ्या डोळ्याचा नंबर साडेतीन पर्यंत पोहचला. त्या चष्मा लावूनच सर्व कामे करावी लागायची. यामुळे अनेक समस्येला त्याला सामोर जावे लागायचे. मंगळवारी या युवकावर ‘लॅसिक लेझर’ उपकरणाच्यामदतीने शस्त्रक्रिया करण्यात आली. जाड चष्मा घालून आलेला हा युवक शस्त्रक्रियेनंतर विना चष्म्याने घरी गेला. केवळ अर्ध्या तासात ही यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.

बुबुळाची जाडी
कमी केली जाते
‘लॅसिक लेझर’ या उपकरणाला ‘लेझर इन सीतू केरॅटोमीलेयुसीस’ असे म्हटले जाते. डोळ्याच्या बुबुळाच्या मध्यभागातील जाडी साधारण ‘.५’ मिलिमीटर वाढलेली असल्यास त्यात एक नंबर कमी करण्यासाठी १०-१२ मायक्रॉनपर्यंत ही जाडी कमी केल्या जाते. ही सर्व प्रक्रिया ‘लेझर’द्वारे होते. या शस्त्रक्रियेत रुग्णाला इंजेक्शन दिले जात नाही किंवा चिराही लावला जात नाही. वेदनारहित ही १०० टक्के यशस्वी शस्त्रक्रिया आहे.
- डॉ. अशोक मदान
विभाग प्रमुख, नेत्ररोग विभाग मेडिकल

Web Title: The third number of specs is minus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.