अमरावती जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:08 AM2021-05-20T04:08:00+5:302021-05-20T04:08:00+5:30

सुमेध वाघमारे नागपूर : कोरोनाची पहिली लाट ओसरत असताना दुसऱ्या लाटेच्यावेळी सर्वाधिक रुग्ण अमरावतीमध्ये नोंद झाले होते. यावरून कोरोनाची ...

The third wave of corona in Amravati district? | अमरावती जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट?

अमरावती जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट?

Next

सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोनाची पहिली लाट ओसरत असताना दुसऱ्या लाटेच्यावेळी सर्वाधिक रुग्ण अमरावतीमध्ये नोंद झाले होते. यावरून कोरोनाची दुसरी लाट अमरावती येथून सुरू झाल्याचे म्हटले जाते. विशेष म्हणजे, याच जिल्ह्यात दुसरी लाटेतील रुग्ण कमी झाले असताना अलीकडे रुग्ण वाढत असल्याने ही तिसरी लाट तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. परंतु तज्ज्ञांच्या मते, इतक्या कमी दिवसांत तिसरी लाट येणे किंवा लाटेवर लाट येणे शक्य नाही. परंतु या जिल्ह्यातील कोरोनाबाबतचा अभ्यास होणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अमरावती जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्ण वाढायला लागले. १ फेब्रुवारी रोजी ९२ रुग्णांची नोंद झाली असताना १४ फेब्रुवारी रोजी ३९९ रुग्णांची नोंद झाली. १ ते १४ फेब्रुवारीदरम्यान ३,३१५ रुग्णांची वाढ झाली. १५ ते २१ फेब्रुवारीदरम्यान ४,२३० रुग्णांची भर पडताच जिल्हा प्रशासनाने २२ फेब्रुवारीपासून कडक निर्बंध लावले. २२ ते २८ फेब्रुवारीमध्ये ५,५९३ रुग्णांची नोंद झाली. वाढत असलेल्या रुग्णसंख्येला घेऊनच २२ फेब्रुवारीपासून कडक निर्बंध लावण्यात आले.

-अंतर्गत कडक निर्बंधामुळे दुसरी लाट ओसरल्याचे चित्र

अमरावती जिल्ह्यात निर्बंधाचा प्रभाव दिसून येण्यास साधारण १५ दिवसांचा कालावधी लागला. त्यामुळे २२ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत ५,५९३ नवे रुग्ण आढळून आले. १ ते ११ मार्च दरम्यान ६,१६६ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्या कमी होऊ लागली. १२ ते २१ मार्चदरम्यान ४,११२, २२ ते ३१ मार्चदरम्यान ३,२४०, १ ते १० एप्रिलदरम्यान ३,२८८ नवे रुग्ण आढळून आले. दुसरी लाट ओसरत असल्याचे मत व्यक्त होऊ लागले.

- यामुळे तिसऱ्या लाटेची शंका वाढली

रुग्णसंख्येत कमालीची घट येताच, कोरोनावर नियंत्रण मिळविणारा अमरावती जिल्हा ‘मॉडेल’ म्हणून नावारुपास आला. परंतु १५ मार्चपासून राज्याचे निर्बंध लागू झाले. जिल्ह्याचे कडक निर्बंध निघाले. शहर आणि ग्रामीण भागातील लोकांची अंतर्गत रहदारी वाढली. लग्न सोहळ्यात लोक सहभागी होऊ लागले. परिणामी, पुन्हा रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली. ११ ते २० एप्रिलदरम्यान ५,९४२, २१ ते ३० एप्रिलमध्ये ७,८५२ नवे रुग्ण आढळून आले. १० मे रोजी तर रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. १,००५ रुग्णांची नोंद झाली. १ ते १० मे यादरम्यान सर्वाधिक १०,७२३ रुग्ण आढळून आले. ११ ते १९ मेदरम्यान ८,८५९ रुग्णांची नोंद झाली. या संख्येला घेऊनच अमरावतीमध्ये तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविला जात आहे; परंतु जिथे ग्रामीण भागात कमी रुग्ण होते तिथे रुग्ण वाढल्याने रुग्णसंख्येत भर पडल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

-तिसरी लाट नक्कीच नाही

मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या कमी होताना दिसत होती. यादरम्यान कोरोनाचा प्रतिबंधक नियमांची लोकांकडून काटेकोरपणे अंमलबजावणी झाली नाही. याच काळात लग्न सोहळे, कौटुंबिक कार्यक्रम झाले. त्याचा परिणाम, एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून दिसायला लागला. अमरावती जिल्ह्यात दुसरी लाट गेलीच नाही तर तिसऱ्या लाटेचा प्रश्न येतोच कुठे? सध्या मागील काही दिवसांत रुग्णसंख्या पुन्हा कमी होताना दिसून येत आहे.

-डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्य चिकित्सक, अमरावती जिल्हा

-अमरावती जिल्ह्यातील चार महिन्यांतील स्थिती

कालावधी : नव्या रुग्णांची संख्या

१ ते १४ फेब्रुवारी : ३,३१५

१५ ते २१ फेब्रुवारी : ४,२३०

२२ ते २८ फेब्रुवारी : ५,५९३

१ ते ११ मार्च : ६,१६६

१२ ते २१ मार्च : ४,११२

२२ ते ३१ मार्च : ३,२४०

१ ते १० एप्रिल : ३,२८८

११ ते २० एप्रिल : ५,९४२

२१ ते ३० एप्रिल : ७,८५२

१ ते १० मे : १०,७२३

११ ते १९ मे : ८,८५९

Web Title: The third wave of corona in Amravati district?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.