तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:08 AM2021-05-07T04:08:33+5:302021-05-07T04:08:33+5:30

सुमेध वाघमारे नागपूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान लहान मुले व कुमारवयीन मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण फारसे नव्हते. परंतु दुसऱ्या लाटेत ...

The third wave is dangerous for children! | तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक!

तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक!

Next

सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान लहान मुले व कुमारवयीन मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण फारसे नव्हते. परंतु दुसऱ्या लाटेत पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा व गोंदिया जिल्ह्यांमध्ये १९ वर्षांपर्यंतच्या वयोगटात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून आले आहे. जानेवारी महिन्यात या सहाही जिल्ह्यांत १,१९१ नोंद झाली असताना एप्रिल महिन्यात ती वाढून ३२,९९१ वर पोहोचली. मागील चार महिन्यांत तब्बल ४५,५२० मुले कोरोनाग्रस्त झाली आहेत. यामुळे येणाऱ्या तिसऱ्या लाटेत लहान मुले सर्वाधिक प्रभावित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

राज्यात ‘कोविड-१९’ विषाणूमध्ये दोन म्युटेशन (बदल) तर नागपूर जिल्ह्यात विषाणूचे पाच नवे ‘स्टेन’ आढळून आले आहेत. नव्या ‘स्टेन’मध्ये लागण क्षमता खूप जास्त आहे. परंतु येत्या काळात विषाणूमध्ये आणखी (म्युटेशन) बदल होऊन आजाराची गंभीरता वाढण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्हे मिळून जानेवारी महिन्यात १९ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील १,१९१ मुले कोरोनाबाधित झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात ही संख्या वाढून २,२४१ झाली. मार्च महिन्यात ९,०९७ तर एप्रिल महिन्यात ३२,९९१ मुलांना कोरोनाची लागण झाली. मुलांमध्ये कोरोनाचा वाढत्या संसर्गामुळे वैद्यकीय क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे.

- नागपूर जिल्ह्यात जानेवारीत ९०३ तर एप्रिल महिन्यात २०,८१० मुले बाधित

नागपूर जिल्ह्यात जानेवारी ते एप्रिल या कालावधीत ३०,४२० बाधित मुलांची नोंद झाली. विशेष म्हणजे, जानेवारी महिन्यात बाधित मुलांची संख्या ९०३ होती. फेब्रुवारी महिन्यात ती वाढून १,७४१ झाली. मार्च महिन्यात ६,९६६ बाधितांची भर पडली तर एप्रिल महिन्यात साधारण यात १३ हजार नव्या रुग्णांची भर पडून २०,८१० झाली.

- भंडारा जिल्ह्यात ४,३२९ मुलांना कोरोनाची लागण

नागपूरनंतर भंडारा जिल्ह्यात चार महिन्यांत सर्वाधिक ४,३२९ मुलांना कोरोनाची लागण झाली. जानेवारी महिन्यात ही संख्या ६६ होती. फेब्रुवारी महिन्यात कमी होऊन ती ३० वर पोहोचली. मात्र, मार्च महिन्यात ४९९ तर एप्रिल महिन्यात ३,७३४ झाली.

- चंद्रपूर जिल्ह्यात ४,०७८ मुलांना संसर्ग

चंद्रपूर जिल्ह्यात चार महिन्यांत ४,०७८ मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला. जानेवारीत ही संख्या केवळ ६९ होती. फेब्रुवारीत वाढून ७६, मार्चमध्ये ४६४ तर एप्रिलमध्ये ३,४६९ वर पोहोचली.

- वर्धा जिल्ह्यात ३,१७६ मुलांना लागण

वर्धा जिल्ह्यात चार महिन्यांत ३,१७६ मुलांना लागण झाली. नागपूर, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यानंतर या जिल्ह्यात सर्वाधिक नोंद झाली. जानेवारीत ८५, फेब्रुवारीत ३४६, मार्चमध्ये ६४४ तर एप्रिलमध्ये २,१०१ मुले बाधित झाली.

- गोंदिया जिल्ह्यात २,३०४ मुले कोरोनाग्रस्त

गोंदिया जिल्ह्यात मागील चार महिन्यांत २,३०४ मुले कोरोनाग्रस्त झाली. जानेवारीत ३० बाधित मुलांची नोंद झाली असताना फेब्रुवारीत कमी होऊन ती १८ वर आली. परंतु मार्च महिन्यात वाढ होऊन ३१८ तर, एप्रिल महिन्यात १,९३८ वर गेली.

- गडचिरोली जिल्ह्यात १,२१३ मुले बाधित

गडचिरोली जिल्ह्यात जानेवारी ते एप्रिल या कालावधीत १,२१३ मुले बाधित झाली. जानेवारीमध्ये ३८, फेब्रुवारीत ३०, मार्चमध्ये २०६ तर एप्रिलमध्ये ९३९ बाधितांची नोंद झाली.

- लहान मुलांमध्ये संसर्ग वाढला

गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी लहान मुलांमध्ये संसर्ग वाढला आहे. पालकांकडून मुलांना तर काही वेळा मुलांकडून संपूर्ण कुटुंबाला आजार झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे लहान मुलांना जपायला हवे. सध्या तरी १८ वर्षांखालील मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस नाही. यातच कोरोना विषाणूमध्ये ज्या पद्धतीने बदल होत आहे त्यानुसार तिसऱ्या लाटेत लहान मुले बाधित होण्याची शक्यता अधिक आहे.

- डॉ. अविनाश गावंडे (बालरोग तज्ज्ञ) वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल

- मुलांना हात धुण्याची व योग्य मास्क लावण्याची सवय लावा

कोरोनाची तिसरी लाट मुलांवर कसा प्रभाव टाकेल हे आत्ताच सांगणे कठीण आहे. परंतु मुलांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. यासाठी मुलांना नियमितपणे साबणाने आणि पाण्याने हात स्वच्छ धुण्याची सवय लावा. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांपासून त्यांना दूर ठेवा. मास्कचा योग्य वापर करण्याचे प्रशिक्षण द्या व मुलांना गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाणे टाळा.

- डॉ. संजय जयस्वाल (बालरोग तज्ज्ञ) उपसंचालक, आरोग्य विभाग नागपूर

- १९ वर्षांखालील वयोगटातील धक्कादायक आकडेवारी

जिल्हा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल

भंडारा ६६ ३० ४९९ ३७३४

चंद्रपूर ६९ ७६ ४६४ ३४६९

गडचिरोली ३८ ३० २०६ ९३९

गोंदिया ३० १८ ३१८ १९३८

नागपूर ९०३ १७४१ ६९६६ २०८१०

वर्धा ८५ ३४६ ६४४ २१०१

Web Title: The third wave is dangerous for children!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.