तिसऱ्या लाटेत ४८० मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:08 AM2021-07-20T04:08:19+5:302021-07-20T04:08:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाची तिसरी लाट आलीच तर नागपूर जिल्ह्याला ४८० मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता लागणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाची तिसरी लाट आलीच तर नागपूर जिल्ह्याला ४८० मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता लागणार आहे. याचे नियोजन करण्यात आले आहे. तामिळनाडू येथून १२५ मेट्रिक टन साठवणूक क्षमता असलेला ऑक्सिजन जम्बो टँक मंगळवारी शहरात दाखल होत आहे. जम्बो टँक शासकीय मनोरुग्णालय परिसरात स्थापित करण्यात येणार आहे. यासाठी १ कोटी ९६ लक्ष रुपये खर्च येणार असून, येत्या १५ दिवसांत ऑक्सिजन साठवणुकीची व्यवस्था पूर्ण होईल, अशी माहिती पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली. सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत हाेते.
यावेळी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी विमला आर., मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. भृशुंडी, डॉ. सरनाईक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, महापालिका उपायुक्त राम जोशी उपस्थित होते. जिल्ह्यात १ लाख ७५ हजार विविध क्षेत्रांतील कामगार असून, त्यांच्या लसीकरणासाठी कालबद्ध नियोजन करण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.