तिसरी लाट नियंत्रणात; नागपुरात २७ दिवसानंतर हजाराच्या आत कोरोनाचे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2022 10:11 PM2022-02-07T22:11:04+5:302022-02-07T22:12:48+5:30
Nagpur News कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात येत आहे. २७ दिवसानंतर पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णसंख्या हजाराच्या आत आली. सोमवारी ७६७ रुग्ण व ४ मृत्यूची नोंद झाली.
नागपूर : कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात येत आहे. २७ दिवसानंतर पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णसंख्या हजाराच्या आत आली. सोमवारी ७६७ रुग्ण व ४ मृत्यूची नोंद झाली. चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्हिटीचा दर १० टक्क्यांवर आला आहे. रुग्णांची एकूण संख्या ५,७२,७९१ झाली असून मृतांची संख्या १०,२९२ वर पोहचली आहे.
नागपूर जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्णसंख्या वाढण्यास सुरूवात झाली. १२ जानेवारी रोजी पहिल्यांदाच रुग्णसंख्या हजारावर गेली. या दिवशी १,४६१ रुग्णांची नोंद झाली. पुढे रुग्णसंख्या चार हजारांवर गेली. परंतु १७ दिवसांतच म्हणजे, २९ जानेवारीपासूनच रुग्णसंख्येत घट होऊ लागली. त्यानंतर ७ फेब्रुवारी रोजी पुन्हा रुग्णसंख्या हजाराच्या आत आली.
- शहरात ४८० तर ग्रामीणमध्ये २५९ रुग्ण
शहरात आज झालेल्या ५,६८९ चाचण्यांपैकी ४८० रुग्ण तर, ग्रामीणमध्ये झालेल्या १,७१३ चाचण्यांपैकी २५९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात जिल्ह्याबाहेरील २८ रुग्णांची भर पडली. शिवाय, शहरात ३ तर ग्रामीणमध्ये १ रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णसंख्येच्या तुलनेत आज अधिक २,०३९ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचा दर ९५.८८ टक्क्यांवर पोहचला आहे. सध्या कोरोनाचे एकूण १३,३२८ रुग्ण सक्रिय आहेत. यातील १२,००९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर १,३१९ रुग्ण विविध शासकीय, खासगी रुग्णालयात व संस्थात्मक विलगीकरणात आहेत.