आठ पंपातून भागते वन्यप्राण्यांची तहान
By Admin | Published: April 27, 2017 02:03 AM2017-04-27T02:03:52+5:302017-04-27T02:03:52+5:30
उन्हाळ्यात तापमानात वाढ होत असल्याने माणसांप्रमाणेच वन्यप्राण्यांनाही पाण्याची अधिक गरज भासते.
सौरपंपाद्वारे पाणवठ्यांना पाणीपुरवठा : वन विभागाचा कळमेश्वर वनपरिक्षेत्रात उपक्रम
कळमेश्वर : उन्हाळ्यात तापमानात वाढ होत असल्याने माणसांप्रमाणेच वन्यप्राण्यांनाही पाण्याची अधिक गरज भासते. वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, या उद्देशाने वन विभागाने कळमेश्वर वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या निमजी व लिंगा बिटमध्ये पाणवठ्यालगत बोअरवेल करून त्यावर सौर प्लेट बसवून पंपाद्वारे पाणवठ्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. वन विभागाच्या या स्तुत्य उपक्रमामुळे वन्यप्राण्यांची तहान भागविली जात आहे. पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने वन्यप्राण्यांची संख्याही वाढत आहे.
कळमेश्वर वनपरिक्षेत्रांतर्गत लिंगा, निमजी बिट १२३०.६३ हेक्टर परिसर जंगलाने व्यापलेला आहे. या जंगलात वाघ, बिबट, अस्वल, नीलगाय, सांबर, चितळ, मोर आदी वन्यप्राण्यांची संख्या अधिक आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत जंगलातील पाणी आटल्याने वन्यप्राण्यांना पाण्याअभावी जंगलाबाहेर भटकंती करावी लागते. यामुळे या प्राण्यांना शिकाऱ्यांची भीती असून वन्यप्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी शेतीच्या सभोवताल लावलेल्या जिवंत विद्युत तारांना स्पर्श झाल्यास जीवितहानी होऊ शकते. तसेच शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसानही हे वन्यप्राणी करीत असतात. या समस्येवर उपाय म्हणून सदर दोन्ही बिटांमध्ये नाला खोलीकरण, चार तळे व आठ सौर ऊर्जेवर चालणारे पंप लावण्यात आले. सौरऊर्जा प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्यामुळे उन्हामुळे जंगलातील सौरपंप आपोआप सुरू होतात आणि सायंकाळी बंद होतात. यामुळे आठही पाणवठे पाण्याने पूर्णत: भरलेले असतात. शिवाय जंगलात खोदलेल्या चार तळ्यांपैकी दोन तळ्यांना उन्हाळ्यात पाणी आहे तर नाला खोलीकरणामुळे नाल्यामध्ये सद्यस्थितीत ३ ते ४ फुटापर्यंत पाणी उपलब्ध आहे.
सदर तिन्ही योजना यशस्वी झाल्याने जंगलात सध्या भरपूर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यामुळे वन्यप्राण्यांची संख्या अलीकडे वाढलेली आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज मोहिते यांनी ‘लोकमत’ला दिली. (प्रतिनिधी)