ऑर्डनन्स फॅक्टरीत नोकरीच्या नावाखाली साडेतेरा लाखांचा गंडा
By योगेश पांडे | Published: June 11, 2024 06:12 PM2024-06-11T18:12:42+5:302024-06-11T18:13:53+5:30
Nagpur : आरोपींनी पिडीत तरुणांना दिले खोटे नियुक्तीपत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑर्डनन्स फॅक्टरीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली आठ आरोपींनी तीन तरुणांना साडेतेरा लाख रुपयांचा गंडा घातला. आश्चर्याची बाब म्हणजे आरोपींनी या तरुणांना खोटे नियुक्तीपत्रदेखील दिले. नोकरीसाठी रुजू होण्यासाठी गेल्यावर हा प्रकार समोर आला. सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.
राजीव हिरास्वामी रेड्डी (निखारे ले आऊट, मानकापूर), मिर्झा वसीम बेग राशीद बेग (गुलशननगर, यवतमाळ), सूरज राजकुमार घोरपडे (बुद्धनगर, कवडा, देवळी, वर्धा), त्याची पत्नी सोनाली, शैलेश बाबाराव गोल्हे (महालक्ष्मीनगर, मानेवाडा), ज्ञानेश्वर सिर्सीकर, रोशन अड्याळकर व नितेश कोठारी अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी मंगेश महादेवराव सावरे (३४, समताबाग, हिंगणघाट, वर्धा) व त्याच्या आणखी दोन मित्रांना अंबाझरीतील ऑर्डनन्स फॅक्टरीत नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. या टोळीने त्यांच्याकडून त्याबदल्या व्हीआयपी मार्ग, धरमपेठ येथील बाबा ताज बिल्डींगमधील सौंदर्य इन्स्टिट्यूट ॲंड फायनान्शिअल सर्व्हिसेस येथे १ फेब्रुवारी २०१९ ते २३ मार्च २०२३ या कालावधीत वेळोवेळी साडेतेरा लाख रुपये घेतले.
आरोपींनी तरुणांना बनावट कागदपत्रे दिली व खोटे नियुक्तीपत्रदेखील दिले. त्यांना नोकरी मिळाल्याचा विश्वास बसला. मात्र प्रत्यक्षात कुणालाही नोकरी लागली नव्हती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मंगेशने सिताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपींविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. यामागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता असून अनेक तरुणांना अशा पद्धतीने फसविल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.