नागपुरात साडेतेरा लाखांच्या साबणांची हेराफेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 02:08 AM2020-07-30T02:08:01+5:302020-07-30T02:09:44+5:30
ट्रान्सपोर्ट कंपनीसाठी साबण पोहचविणाऱ्या ट्रकचालकाने १३ लाख ५० हजार रुपये किमतीचे साबणच गायब केल्याचा प्रकार घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ट्रान्सपोर्ट कंपनीसाठी साबण पोहचविणाऱ्या ट्रकचालकाने १३ लाख ५० हजार रुपये किमतीचे साबणच गायब केल्याचा प्रकार घडला.
वाडी येथील ट्रान्सपोर्ट कंपनीने हंसापुरी रोड येथे राहणाऱ्या ट्रकचालक प्रेमशंकर गौर (३०) याच्या माध्यमातून ठाण्यावरून भिवंडीला १३ लाख ५० हजार रुपयांचे साबण पाठविले होते. ट्रक क्रमांक एम.एच./०४/एच.वाय./४०२२ मधून हा माल पाठविण्यात आला होता. मात्र ट्रकचालक गौर याने साबणांची हेराफेरी करून ट्रक औरंगाबादला बेवारस सोडला. त्यानंंतर तो फरार झाला. या प्रकरणी वाडी पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रोख रकमेसह ३.७५ लाखाची चोरी
घराचे काम सुरू असल्याने किरायाच्या घरामध्ये ठेवलेली रोख आणि पावणेचार लाख रुपयांचे दागिने चोरीस गेल्याची घटना घडली. ही घटना गड्डीगोदाम वस्तीमधील चुडी गल्लीत घडली.
विजया अविनाश पिल्लेवान यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. विजया यांनी घराचे साहित्य ठेवण्यासाठी परिसरातीलच एक खोली किरायाने घेतली होती. तिथे असणाऱ्या आलमारीमध्ये त्यानी सव्वादोन लाख रुपये आणि दागिने ठेवले होते. त्या आपल्या भावाच्या घरी राहत होत्या. सोमवारी रात्री अज्ञात आरोपीने घराचे कुलूप तोडून रोख रक्कम आणि दागिने चोरून नेले. या प्रकरणी सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
३६ हजारांनी फसवणूक
सायबर गुन्हेगारांनी लिंक डाऊनलोड करण्याचे सांगून एका व्यक्तीची ३६ हजार रुपयांनी फसवणूक केली.
हिंगणा येथे राहणारे सतीश बन्सोड यांना अज्ञात व्यक्तीचा कॉल आला. त्या व्यक्तीने आपण पेटीएम केवायसी अपडेट करण्यासाठी कॉल केल्याचे सांगितले. त्यासाठी त्याने एक लिंक पाठविली. ती डाऊनलोड करण्यास सांगितले. संबंधित लिंक डाऊनलोड करताच त्याच्या एसबीआय बँकेच्या खात्यामधून ३६ हजार रुपये काढले गेले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी हिंगणा पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी धोकेबाजी तसेच आयटी अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास केला जात आहे.