पीओपी मूर्ती बंदीचे तीनतेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:13 AM2021-09-05T04:13:18+5:302021-09-05T04:13:18+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काेराडी : शासनाने पीओपीच्या मूर्ती बनविणे व विक्रीला बंदी असतानाही महादुला व काेराडी येथे पीओपीच्या मूर्तीची ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेराडी : शासनाने पीओपीच्या मूर्ती बनविणे व विक्रीला बंदी असतानाही महादुला व काेराडी येथे पीओपीच्या मूर्तीची माेठ्या प्रमाणावर विक्री केली जात आहे. गणेशाेत्सवापूर्वी महादुला, काेराडी बाजारपेठेत सर्वत्र पीओपी मूर्तीची दुकाने थाटली आहेत. यामुळे स्थानिकांचा राेजगार बुडत असून, महादुला शहरात पीओपी मूर्ती बंदीची काटेकाेरपणे अंमलबजावणी व्हावी, या मागणी स्थानिक मूर्तिकारांनी नगराध्यक्ष राजेश रंगारी यांना निवेदन दिले आहे.
नागपूर शहरात पीओपी मूर्ती विक्रीला बंदी असल्याने अनेक मूर्तिकार पीओपी मूर्तीची शहरालगतच्या गावांमध्ये विक्री करतात. महादुलासारख्या मोठ्या वस्तीमध्ये पीओपी मूर्ती मोठ्या प्रमाणात विक्री हाेत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होते, तसेच स्थानिकांचा रोजगार जातो. त्यामुळे महादुला शहरात पीओपी मूर्तीवरील बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी. पीओपी मूर्ती विक्री करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी येथील मातीच्या मूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकारांनी नगराध्यक्ष राजेश रंगारी यांच्याकडेे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देताना कुंभार समाज समितीचे अध्यक्ष महेंद्र भातकुलकर यांच्यासह विजय सावरकर, निशांत वझे, अतुल वझे आदींसह स्थानिक मूर्तिकार उपस्थित होते. शासनाच्या आदेशाचे पालन करून आम्ही केवळ मातीच्याच मूर्ती बनवतो. त्यामुळे बाजारपेठेत पीओपीच्या मूर्तीला संधी देऊ नका, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली.
यासंदर्भात शासनाने वेळोवेळी काढलेल्या आदेशाचे पूर्णपणे पालन केले जाईल. पीओपीच्या मूर्ती विक्रीला परवानगी दिली जाणार नाही. अशांवर नगरपंचायतच्या वतीने तात्काळ कारवाई करू, असे आश्वासन नगराध्यक्ष रंगारी यांनी यावेळी दिले.