थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन रात्री ११ पर्यंतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:08 AM2020-12-29T04:08:27+5:302020-12-29T04:08:27+5:30
हॉटेल, सार्वजिनक ठिकाणच्या पार्टीवर निर्बंध - पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन रात्री ...
हॉटेल, सार्वजिनक ठिकाणच्या पार्टीवर निर्बंध - पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन रात्री ११ वाजेपर्यंतच करावे. नंतर सार्वजनिक ठिकाणीच काय हॉटेलमध्येही पार्टीला परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट करीत पोलिसांचे बंदी आदेश झुगारल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी रविवारी दिला.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने महापालिका क्षेत्रात रात्री ११ नंतर नाईट कर्फ्यू लावला आहे. या पार्श्वभूमीवर, ३१ डिसेंबरचा बंदोबस्त कसा असेल, ते जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी आज पोलीस आयुक्तांशी चर्चा केली असता त्यांनी उपरोक्त माहिती दिली.
मावळत्या वर्षाला निरोप देण्याच्या आणि नव्या वर्षाच्या स्वागताच्या नावाखाली अनेक जण नुसताच गोंधळ घालतात. दारूच्या नशेत धांगडधिंगा करतात. रस्त्यारस्त्यावर सेलिब्रेशन केले जाते. हॉटेल, पब, लाऊंजमध्ये मोठमोठ्या पार्ट्या होतात. यंदा मात्र तसे काहीही होणार नाही. दरवर्षीप्रमाणे पोलिसांचा ३१ डिसेंबरचा बंदोबस्त चोख असेल. रस्त्यारस्त्यावर पोलीस राहतील. मात्र, ११ वाजतानंतर सार्वजनिक ठिकाणी पार्टी किंवा सेलिब्रेशनच्या नावाखाली गोंधळ घातल्यास पोलीस संबंधितांवर कडक कारवाई करतील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
---
घरीच करा सेलिब्रेशन
घराच्या आवारात, टेरेसवर, खासगी जागी किंवा सोसायटीत तुम्ही सेलिब्रेशन करू शकता. मात्र, त्याचा कुणाला त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. सेलिब्रेशनच्या नावाखाली कसलाही गोंधळ खपवून घेतला जाणार नाही, असेही पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले.
----