‘थर्टी फर्स्ट’ला गुन्हेगारांचा हैदोस

By admin | Published: January 2, 2017 02:00 AM2017-01-02T02:00:28+5:302017-01-02T02:00:28+5:30

मावळत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लाखो नागपूरकर शनिवारी सज्ज होते.

'Thirty First' is the criminal of Haidos | ‘थर्टी फर्स्ट’ला गुन्हेगारांचा हैदोस

‘थर्टी फर्स्ट’ला गुन्हेगारांचा हैदोस

Next

नागपूर : मावळत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लाखो नागपूरकर शनिवारी सज्ज होते. सर्वत्र उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण होते. या उत्साहावर विरजण पडू नये म्हणून पोलीसही सज्ज होते. रस्त्यारस्त्यावरून धावणारी पोलिसांची वाहने आणि जागोजागी पोलिसांचा प्रचंड ताफा कडक बंदोबस्ताची साक्ष देत होता. मात्र, त्याला न जुमानता गुंड त्यांच्याच शैलीत होते. त्याचमुळे गणेशपेठेत एकाचा खून झाला. यशोधरानगरात गोळीबार झाला. तहसीलमध्ये तलवारीचा हल्ला करून खंडणीची मागणी केली. सोनेगावात चेनस्रॅचिंग घडली. तर सक्करदऱ्यात गुंडांनी तोडफोड केली. मावळत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी दुपारी ३ ते रात्री ११.३० च्या दरम्यान घडलेल्या या घटनांमुळे पोलिसांनी नव्या वर्षात कर्तव्यकठोर बनण्याची गरज अधोरेखित केली आहे.

यशोधरानगरात गोळीबार
संघर्षनगरात क्षुल्लक कारणावरून संघर्ष
क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात गुन्हेगारांनी एकाला बेदम मारहाण केली. तर, मदतीला धावलेल्या त्याच्या भावावर गोळी झाडली. सुदैवाने नेम चुकल्यामुळे मोहम्मद आसिफ अंसारी (वय २५) या तरुणाचा जीव वाचला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री १०.३० वाजता ही थरारक घटना घडली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
शनिवारी रात्री संघर्षनगरातील मैदानाजवळ एक लग्नसमारंभ होता. त्यात मोहम्मद राशिद ऊर्फ गोलू आपल्या नातेवाईक, मित्रमंडळीसोबत सहभागी झाला होता. येथे मोहम्मद फैजान ऊर्फ फैजूल (वय २१) मोहम्मद ऐहफाज (वय २०), फिरोज खान ऊर्फ सोनू (वय २३) आणि शेख शहजाद ऊर्फ पप्पू (रा. संघर्ष नगर, मेहबुबपुरा) हेसुद्धा आले होते. राशिदचा या चौघांतील एकासोबत वाद झाला. त्यांनी एकमेकांना मारहाण केली.
त्यानंतर आरोपी धावले. त्यांनी राशिदला लाथाबुक्क्यांनी बदडणे सुरू केले. ते पाहून राशिदचा भाऊ मोहम्मद आसिफ अन्सारी (वय २५, रा. संघर्षनगर) भांडण सोडवायला गेला. आरोपींनी त्यालाही मारहाण केली आणि पिस्तूलातून आसिफवर गोळी झाडली. सुदैवाने नेम चुकल्याने पहिली गोळी हवेत वाकडीतिकडी गेली तर दुसरी गोळी झाडताना पिस्तूल लॉक झाले. त्यामुळे ती गोळी खाली पडली आणि आसिफचा जीव वाचला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. धावपळ आणि गोंधळामुळे समारंभातील पाहुण्यांनी कार्यक्रमस्थळावरून काढता पाय घेतला.
माहिती कळताच यशोधरानगर पोलिसांचा ताफा घटनास्थळी धावला. आसिफच्या तक्रारीवरून एपीआय बांदेकर यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर फैजूल, ऐहफाज आणि फिरोजला पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले. तर, रविवारी सकाळी पप्पूलाही अटक करण्यात आली.(प्रतिनिधी)

पिस्तूल कुणाकडून आणले ?
मावळत्या वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने शहरातील सर्वच भागात पोलिसांचा चांगल्यापैकी बंदोबस्त होता. मात्र, त्याला न जुमानता आरोपींनी गोळीबार करून आसिफचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणातील आरोपींचा काही कुख्यात गुन्हेगारांशी संबंध आहे. हवालाची रोकड लुटणारा अन् काही दिवसांपूर्वी कत्तलखान्यात नेणारी जनावरे वाचविणाऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या गुन्हेगारांसोबतही हे प्रकरण जोडले जात आहे. आरोपींनी त्या गुन्हेगारांकडूनच पिस्तूल आणले असावे, अशी चर्चा आहे. पोलिसांनी त्या दिशेने तपास केल्यास धक्कादायक खुलासा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 

Web Title: 'Thirty First' is the criminal of Haidos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.