पाचपावलीतील लुटमारीचा तीस तासात छडा

By Admin | Published: July 7, 2017 01:59 AM2017-07-07T01:59:18+5:302017-07-07T01:59:18+5:30

मंगळवारी दुपारी सराफा व्यावसायिकावर हल्ला करून रोख रक्कम आणि सोन्याचांदीच्या दागिन्यांसह २९

Thirty-five hours of ransom | पाचपावलीतील लुटमारीचा तीस तासात छडा

पाचपावलीतील लुटमारीचा तीस तासात छडा

googlenewsNext

 २७ लाखांचा मुद्देमाल जप्त : दोघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मंगळवारी दुपारी सराफा व्यावसायिकावर हल्ला करून रोख रक्कम आणि सोन्याचांदीच्या दागिन्यांसह २९ लाखांचा मुद्देमाल लुटून नेणाऱ्या दोघांना अटक करण्यात पाचपावली पोलिसांनी यश मिळवले. आकाश मिलिंद इंदूरकर (वय २०, रा. आनंदनगर एनआयटी क्वॉर्टर) आणि राहुल राजू निमजे (वय २९, रा. इंदिरामाता नगर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून रोख रक्कम वगळता इतर सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ते १० जुलैपर्यंत पीसीआरमध्ये आहेत, अशी माहिती परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणीकर यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकारांना दिली. पोलीस आयुक्तालयात झालेल्या या पत्रपरिषदेला सहायक पोलीस आयुक्त बालचंद मुंडे आणि लुटमारीचा छडा लावण्यात महत्त्वाची भूमिका वठविणारे पाचपावलीचे ठाणेदार नरेंद्र हिवरे त्यांच्या सहकाऱ्यांसह उपस्थित होते.
सराफा व्यावसायिक बंडूजी पांडुरंग कुंभारे (रा. हनुमान सोसायटी, वैशालीनगर) हे मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास घरून आपल्या सराफा दुकानात जात होते. एनआयटी गार्डनजवळ त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून दोन लुटारूनी बॅटने त्यांना बेदम मारहाण केली आणि त्यांच्याजवळचे ९०० ग्राम सोन्याचे दागिने, ११ किलो ८४७ ग्राम चांदी दोन ते तीन लाख रुपयांची रोकड अन् अ‍ॅक्टिव्हा असा २८ लाख, ७७ हजारांचा ऐवज लुटारूंनी हिसकावून नेला होता. भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे पाचपावलीत प्रचंड खळबळ निर्माण झाली होती.
माहिती कळताच ठाणेदार नरेंद्र हिवरे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. अतिरिक्त आयुक्त श्यामराव दिघावकर, उपायुक्त राहुल माकणीकर, उपायुक्त (गुन्हे) संभाजी कदम यांनीही घटनास्थळी धाव घेतली. लुटारूंना जेरबंद करण्यासाठी परिमंडळ तीनमधील सहा पोलीस ठाणी आणि गुन्हे शाखेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची एकूण नऊ पथके तयार करण्यात आली. घटनास्थळाच्या आजूबाजूला विचारणा करून परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेजही ताब्यात घेण्यात आले.

केशरचनेवरून मिळाला धागा
४दोन्ही आरोपींनी तोंडावर कापड बांधले होते. मात्र, त्यातील एकाचे केस थेट उभे होते, अशी माहिती काहींनी सांगितली. या आधारे गुन्हेगारांचा अहवाल तपासला असता यशोधरानगरातील आकाश इंदूरकर नामक आरोपीची केशरचना अशा प्रकारची असल्याचे कळाल्याने पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली. सायंकाळी पोलीस त्याच्या घराकडे गेले. मात्र, तो रात्रभर गायब असल्याने त्याच्यावरचा संशय पक्का झाला. त्यामुळे पोलिसांनी त्याची माहिती काढणे सुरू केले. बुधवारी दुपारी तो त्याच्या मित्राला भेटण्यासाठी मध्यवर्ती कारागृह परिसरात येणार असल्याचे कळताच पोलीस कारागृहाच्या परिसरात दबा धरून बसले. आकाश इंदूरकर येताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या बांधल्या. काही मिनिटातच त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आणि लुटमारीत सहभागी असलेला आरोपी राहूल निमजेचेही नाव सांगितले. त्यानंतर पोलिसांनी निमजेलाही अटक केली. त्यांच्या अटकेनंतर पोलिसांनी आरोपी इंदूरकरच्या घराची झडती घेतली असता पोलिसांनी घरात दडवलेले २४ लाख, ३० हजार रुपये किमतीचे ९०० ग्राम सोन्याचे दागिने जप्त केले.

१२ किलो चांदी उघड्यावर फेकली
४ही लुटमार अनेक पैलूंनी लक्षवेधी ठरली आहे. विशेष म्हणजे, प्रारंभी या लुटमारीत अर्धा किलो सोन्यासह २० लाखांचा ऐवज लुटला गेल्याचे कुंभारे आणि त्यांचे निकटवर्तीय सांगत होते. पाचपावली पोलिसांनी मात्र, केवळ १८१ ग्राम सोने आणि सहा ते सात किलो चांदीच्या दागिन्यांसह ८ लाख, ५१ हजारांचा मुद्देमालच चोरीला गेल्याचा दावा केला होता. आता आरोपी सापडल्यानंतर लुटण्यात आलेला (जप्त केलेले) सोने चक्क ९०० ग्राम आणि एकूण ऐवज २९ लाखांच्या आसपास आहे, असे कुंभारेसह पोलीसही सांगत आहेत.
४दुसरे म्हणजे, इंदूरकर आणि निमजेने लुटलेल्या ऐवजांपैकी ११ किलो ८४७ ग्राम चांदीचे दागिने (किंमत २ लाख, २७ हजार) चक्क उघड्यावर फेकून दिले. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सूर्यनगरात झाडाझुडूपाजवळ कुंभारेची अ‍ॅक्टीव्हासुद्धा सोडून दिली. घटनेच्या काही वेळेतच बेवारस अ‍ॅक्टीव्हाची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे तेथे जाऊन पोलिसांनी अ‍ॅक्टीव्हा आणि आजूबाजूचा शोध घेऊन ११ किलो चांदीचे दागिने जप्त केले. या लुटमारीचा छडा लावण्यात पोलिसांना अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबतच ह्युमन इंटेलिजन्सचीही मदत झाली. आरोपींचे चेहरे दिसत नसल्यामुळे पोलिसांनी फेसबुकवरील संबंधित वर्णनाच्या आरोपींचे चेहरे, केशभूषा तपासली. त्यातूनच आकाश इंदूरकरचा छडा लागल्याचेही उपायुक्त माकणीकर यांनी पत्रकारांना सांगितले.
समोसा खाताना लुटमारीचा कट
४आरोपी इंदूरकर हा पेंटिंग करतो तर निमजे कॅटरिंगच्या कामावर जातो. हे दोघे मित्र आहेत. कुंभारे यांच्या सराफा दुकानासमोर एक हॉटेल आहे. तेथे चार-पाच दिवस समोसा खाता खाता त्यांना निमजे एकटेच दुचाकीवरून सोन्याचांदीचे दागिने घेऊन येतात, हे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी कुंभारेंना लुटण्याचा कट रचला.
४बाजूच्या मैदानात क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने रेकी केली आणि मंगळवारी कुंभारे यांना लुटले. दरम्यान, लुटलेला सर्व ऐवज पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र, अडीच लाखांची रोकड अद्याप पोलिसांना मिळाली नाही. आरोपींनी त्याबाबत काही सांगितले नाही,असे पोलीस म्हणतात.
अभिनंदन आणि रिवॉर्ड !
४या लुटमारीचा छडा लावण्यात पाचपावलीचे ठाणेदार नरेंद्र हिवरे, उपनिरीक्षक पी. पी. इंगळे, हवलदार संजय वानखेडे, नायक सारिपुत्र फुलझेले, अविराज भागवत, शैलेश चौधरी, दिनेश चाफले, शिपाई सचिन भीमटे सुभाष सौंदरकर आणि दिनेश भोयर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका वठविली असून, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सह पोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. या चमूला १५ हजार रुपयांचा रिवॉर्ड देणार असल्याचेही उपायुक्त माकणीकर यांनी पत्रकारांना सांगितले.

Web Title: Thirty-five hours of ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.