स्लम भागातील ३० टक्के नागरिकांचे लसीकरण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 11:45 PM2021-06-01T23:45:11+5:302021-06-01T23:45:35+5:30
slum dwellers are not vaccinated लसीचा मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण बंद आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. नागपूर शहरात ४५ वर्षांवरील नागरिकांची संख्या सुमारे सहा ते साडेसहा लाख आहे. यातील ५ लाख ३ हजार ७४ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. अजूनही एक ते दीड लाख नागरिकांनी डोस घेतलेला नाही. यात प्रामुख्याने स्लम भागातील ३० टक्के नागरिकांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लसीचा मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण बंद आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. नागपूर शहरात ४५ वर्षांवरील नागरिकांची संख्या सुमारे सहा ते साडेसहा लाख आहे. यातील ५ लाख ३ हजार ७४ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. अजूनही एक ते दीड लाख नागरिकांनी डोस घेतलेला नाही. यात प्रामुख्याने स्लम भागातील ३० टक्के नागरिकांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे.
४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी महापालिकेने लसीकरण आपल्या दारी मोहीम हाती घेतली आहे, सोबतच विविध उपक्रम राबविले जात आहेत. जनजागृती केली जात आहे. सेवाभावी संस्थांची मदत घेतली जात आहे. यात रोटरी ईशान्य, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, मनपा कर्मचारी, भोपाळ इंजिनिअरिंगच्या माजी विद्यार्थ्यांचा ग्रुप, समूह संघटक, महिला बचत गट व झोनस्तरावरील कर्मचारी आदींचा समावेश असल्याची माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
राज्य शासनाने १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना लस देण्याचे जाहीर केल्यानंतर, शहरात केवळ ११ हजार १४१ नागरिकांना लस देण्यात आली. मात्र त्यानंतर लसीचा निर्माण झालेला तुटवडा बघता, या वयोगटाचे लसीकरण बंद करण्यात आले. आता केवळ ४५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जात आहे. त्यामुळे आधी दररोज १५ ते १६ हजार लाभार्थ्यांना डोस दिले जात होते. परंतु आता हा आकडा दोन ते अडीच हजारांवर आला आहे. नागपूर शहरात आतापर्यंत ५.३ लाख लाभार्थ्यांना पहिला डोस, तर १ लाख ६४ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
लसीकरणासाठी पुढे यावे-आयुक्त
४५ वर्षांवरील लसीकरण मोहिमेमध्ये पात्र व्यक्तींनी लसीकरणासाठी पुढे येऊन आपले लसीकरण करून घ्यावे. मनपाद्वारे जारी दिशानिर्देशांचे पालन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. स्वत:च्या व इतरांच्या सुरक्षेसाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहनसुद्धा मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
नागपुरात लसीकरणाची अद्ययावत स्थिती
पहिला डोस
आरोग्य सेवक - ४५,५४५
फ्रंटलाईन वर्कर -५२,९०५
१८ वयोगट - (सध्या बंद आहे)
४५ वयोगट - १,३४,०९३
४५ कोमार्बिड -८३,४२१
६० सर्व नागरिक - १,७६,४६९
पहिला डोस - एकूण - ५,०३,५७४
दुसरा डोस
आरोग्य सेवक - २३,१९४
फ्रंटलाईन वर्कर - १९,४७१
४५ वयोगट - २९,२८१
४५ कोमार्बिड - १८,२७९
६० सर्व नागरिक - ७३,७७९
दुसरा डोस - एकूण - १,६४,००४