नागपूर रेल्वेस्थानकावर मोबाईल चोरास ३३ मिनिटांत अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 11:45 AM2018-12-17T11:45:24+5:302018-12-17T11:45:52+5:30
पॅसेंजर लाऊंजमध्ये प्रवाशाने चार्जिंगला लावलेला मोबाईल पळविणाऱ्या आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाने सीसीटीव्हीच्या साह्याने ३३ मिनिटात अटक केल्याची घटना रविवारी सकाळी १०.३६ वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पॅसेंजर लाऊंजमध्ये प्रवाशाने चार्जिंगला लावलेला मोबाईल पळविणाऱ्या आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाने सीसीटीव्हीच्या साह्याने ३३ मिनिटात अटक केल्याची घटना रविवारी सकाळी १०.३६ वाजताच्या सुमारास घडली. आरोपीला मुद्देमालासह लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले आहे.
रविवारी सकाळी १०.०३ वाजता आरपीएफचा जवान विकास शर्मा यास एक प्रवासी फिरताना आढळला. त्याने आपले नाव दीपक रामभाऊ शाह (२९) रा. समस्तीपूर, बिहार सांगितले. दोन दिवसांपूर्वी विकत घेतलेला सॅमसंग कंपनीचा मोबाईल पॅसेंजर लाऊंजमध्ये चाजर््िगिंला लावला असताना अज्ञात आरोपीने चोरी केल्याची माहिती त्याने दिली. त्यावर निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांच्या आदेशावरून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. सीसीटीव्हीत संशयित आरोपीजवळ आला. त्याने आपल्याजवळील तुटका फुटका मोबाईल काही काळ चार्जिंगवर लावला. कुणाचेच लक्ष नसल्याचे पाहून आरोपीने आपला खराब मोबाईल तेथेच ठेवून प्रवाशाचा मोबाईल घेऊन पळ काढला. आरोपीबाबत ड्युटीवरील जवान विकास शर्मा, उषा तिग्गा, सुषमा ढोमणे यांना कळविण्यात आले. आरोपी १०.३६ वाजता प्लॅटफार्म क्रमांक १ वर स्लिपरक्लास वेटिंग हॉलच्या बाजूला आढळला. लगेच त्यास अटक करून उपनिरीक्षक गौरीशंकर एडले यांच्यासमोर हजर केले. त्याने आपले नाव प्रकाश मनोहर खांडेकर (५६) रा. जरीपटका सांगितले. त्याने मोबाईल चोरीची कबुली दिली. निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक गौरीशंकर एडले यांनी आरोपीला मुद्देमालासह लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द केले.