ही लढाई सामाजिक समरसता विरुद्ध समतेची; समता योद्धा पुरस्कारांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2023 08:55 PM2023-04-14T20:55:00+5:302023-04-14T20:55:42+5:30
Nagpur News संविधान संपवून मनुस्मृती लागू करण्याचा प्रयत्न होत आहे. याच्या विरोधात लढा उभारावा लागेल. ही लढाई सामाजिक समरसता विरुद्ध समतेची आहे, असे मत दिल्ली महाविद्यालयातील प्रो. डॉ. लक्ष्मण यादव यांनी केले.
नागपूर : शिक्षणाचे खासगीकरण करण्यात येत आहे. सामान्य नागरिकांना शिक्षणच घेता येऊ नये म्हणून ते अधिक महागडे करण्यात येते. काहीजण मागासवर्गीयांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत. संविधान संपवून मनुस्मृती लागू करण्याचा प्रयत्न होत आहे. याच्या विरोधात लढा उभारावा लागेल. ही लढाई सामाजिक समरसता विरुद्ध समतेची आहे, असे मत दिल्ली महाविद्यालयातील प्रो. डॉ. लक्ष्मण यादव यांनी केले.
समता सैनिक दलाच्या वतीने दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर सभागृहात समता योद्धा पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यापूर्वी दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन पथसंचलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ॲड. फिरदौस मिर्झा, प्रा. सूरज मंडल, प्रीतम प्रियदर्शी, अमन कांबळे, चित्रपट दिग्दर्शक तृषांत इंगळे, ॲड. स्मिता कांबळे, प्रामुख्याने उपस्थित होते.
माणसाला माणूस बनविण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्यांनी मोठा संघर्ष केला. त्यांच्या संघर्षामुळे आज ९० टक्के लोकांना लाभ होत आहे. डॉ. आंबेडकर इतरांना कळू नये, याचा प्रयत्न झाला. त्यामुळे त्यांच्या समग्र प्रकाशनासाठी ४० वर्षे लागली. पुस्तकातून त्यांना गायब ठेवण्यात आले. ओबीसी व हिंदू कोडबिलसाठी त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. आज विचारधारेची लढाई आहे. संविधान संपवून मनुस्मृती लागू करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचा विरोध झाला पाहिजे. प्रधानमंत्री ओबीसी असल्याचे सांगतात. ते ओबीसी आहेत तर जातनिहाय जनगणना का करीत नाहीत, ओबीसींना ५२ टक्के आरक्षण का देत नाहीत? जाती जनगणना हा सामाजिक न्यायाचा विषय आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ॲड. फिरदौस मिर्झा यांनी बाबासाहेब आता विरोधकांनाही समजावून सांगण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करीत आपण आपल्याकडून तसा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.
संचालन ॲड. आकाश मून यांनी केले. यावेळी स्वप्नील गणवीर, विपीन तातड, महेश इंगोले या रॅप स्टारनी जयभीम कडक हे रॅप गीत सादर करीत तरुणाईमध्ये जोश भरला.