...ही तर अहिल्याबाईंना वाहिलेली आदरांजलीच: मुख्यमंत्री; राम शिंदे सभापतीपदी बिनविरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 07:40 IST2024-12-20T07:40:22+5:302024-12-20T07:40:45+5:30
विधान परिषदेच्या सभापती पदावर प्रा. राम शंकर शिंदे यांची एकमताने निवड झाली. महाविकास आघाडीने उमेदवार न दिल्याने शिंदे यांची बिनविरोध निवड झाली.

...ही तर अहिल्याबाईंना वाहिलेली आदरांजलीच: मुख्यमंत्री; राम शिंदे सभापतीपदी बिनविरोध
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर:विधान परिषदेच्या सभापती पदावर प्रा. राम शंकर शिंदे यांची गुरुवारी एकमताने निवड झाली. महाविकास आघाडीने उमेदवार न दिल्याने शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. याची उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांनी सभागृहात घोषणा केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित त्यांच्या कुटुंबातील नवव्या पिढीतील व्यक्ती सभागृहाच्या खुर्चीवर बसत आहे. एकप्रकारे त्यांना वाहिलेली ही आदरांजलीच आहे, अशी भावना यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
सभापती निवडीचा प्रस्ताव सदस्य श्रीकांत भारतीय, उमा खापरे, शिवाजीराव गर्जे यांनी मांडला. त्याला सदस्य मनीषा कायंदे, अमोल मिटकरी, ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अनुमोदन दिले. शिंदे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीद्वय एकनाथ शिंदे व अजित पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभापतींच्या खुर्चीवर बसविले.
सभापतींच्या खुर्चीत रामशास्त्रींचा आत्मा
राम शिंदे हळवे व्यक्तिमत्त्व आहे. सभागृहात कधी कधी टोकाचे प्रसंग होतात, त्यावेळी हळव्या मनाचे रामभाऊ प्रसंग कसे हाताळतील? असा प्रश्न मनात आला होता. मात्र, खुर्चीत बसल्यावर रामशास्त्री प्रभुणेंचा आत्मा त्या खुर्चीत येतो. त्यामुळे अशी वेळ आली तर शिंदे योग्यप्रकारे हाताळतील, असा विश्वास आहे. याअगोदर रामचंद्र सोमण, रामराव हुकेरीकर, रामकृष्ण गवई, राम मेधे, रामराजे निंबाळकर हे विधान परिषदेचे सभापती राहिले आहेत. ज्यांच्यात राम त्यांना बसण्याची संधी जास्त आहे, असे फडणवीस म्हणाले.
गोंधळात वेळ वाया घालवू नये : शिंदे
यावेळी नवनिर्वाचित सभापती शिंदे भावना व्यक्त करताना म्हणाले, गोंधळात सभागृहाचा बहुमूल्य वेळ वाया जाणार नाही याची काळजी आपल्याला घेतली पाहिजे.
मी सभागृह नेता असून, आता सभापती पदावर शिंदे आले आहेत. त्यामुळे लोकशाहीच्या मंदिरात शिंदेशाहीच आली आहे. शेतकरी पुत्राने संघर्षातून हे पद गाठले आहे. ते सभागृहाला नव्या उंचीवर नेतील. - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
शिंदे निश्चितच सभापती पदाचा गौरव वाढवतील यात काहीच शंका नाही. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी मनाचा मोठेपणा दाखविला व एकमताने सर्वोच्च सभागृहाच्या सर्वोच्च पदावर त्यांची निवड केली. महाराष्ट्राची परंपरा सभागृहाने जपली आहे. - अजित पवार, उपमुख्यमंत्री