हेच खरे विठू-रखमाई, पैशाचा मोह ना ठायी! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2022 07:49 PM2022-07-11T19:49:32+5:302022-07-11T19:50:09+5:30

Nagpur News विदर्भाच्या पंढरीत यात्रेत सापडलेलं पन्नास हजार रुपयांचं बंडल पोलिसांच्या सुपूर्द करून विठ्ठल रुखमाईच्या रुपाने आलेल्या वारकरी जोडप्याने आपल्या भक्तीचे एकप्रकारे दर्शनच घडवले.

This is true Vithu-Rakhmai, don't be tempted by money! | हेच खरे विठू-रखमाई, पैशाचा मोह ना ठायी! 

हेच खरे विठू-रखमाई, पैशाचा मोह ना ठायी! 

Next
ठळक मुद्देविदर्भाच्या पंढरीत सापडलेले ५० हजारांचे बंडल केले परत


नागपूर : विठू-माऊलीच्या दर्शनाची आस घेऊन वयाच्या सत्तरीत असलेलं वारकरी जोडपं विदर्भाची पंढरी असलेल्या धापेवाड्यात दाखल झालं. दर्शन घेऊन परतताना जत्रेत ५० हजार रुपयांचे बंडल सापडले; पण मोहात अडकून प्रामाणिकपणा सोडेल तो वारकरी कसला. पैशांचे बंडलही त्यांचं सत्व मोडू शकला नाही. सापडलेल्या पैशांचे बंडल थेट पोलिसांच्या हाती सोपवून त्यांच्यातल्या माऊलीचे एकप्रकारे दर्शनंच घडले.

विदर्भाचे पंढरपूर धापेवाडा येथे आषाढी एकादशीनिमित्त यात्रा भरली. भाविकांची प्रचंड गर्दी जमली. विठुरायाच्या दर्शनासाठी पिंपळा डाग बंगला येथे राहणारे वयोवृद्ध आनंदराव महिपत सावरकर हे पत्नीसह पोहचले. दर्शन आटोपून परतताना त्यांना गर्दीत कुणाचेतरी ५० हजार रुपयांचे बंडल पडल्याचे दिसले. त्यांनी ते उचलले. या रकमेवर फेडरल बँक नागपूरचे कव्हर होते. यात्रेत सावनेर पोलीस ठाण्याचे पथक सुरक्षेसाठी तैनात होेते. पोलीस शिपाई अशोक निस्ताने यांचेकडे त्यांनी हकिकत सांगितली. शिपाई निस्ताने यांनी वृद्ध दांपत्याला पोलीस निरीक्षक मारुती मुळूक यांच्याकडे नेले. दांपत्याने सापडलेली रक्कम पोलीस निरीक्षक मुळूक यांच्याकडे सादर केली. या वारकरी दांपत्याचा प्रामाणिकपणा पाहून पोलीसही सुखावले.

विठू पाहतोय, इमानदारीनंच जगायचं!

- वारकरी दांपत्याने पोलिसांना ५० हजारांचे बंडल परत केल्यावर पोलिसांनी त्यांचे कौतुक केले. महागाईच्या काळात एवढी मोठी रक्कम सापडली तर भल्याभल्याची नियत फिरल्याशिवाय राहत नाही. पोलिसांनी सावरकर दांपत्याला हाच प्रश्न केला. त्यावर आनंदराव म्हणाले, विठू सर्व पाहतोय. सापडलेले हे पैसे किती दिवस पुरतील. ज्याचे हरवले असतील तो किती दुखात असेल. आयतं नकोच. मेहनतीचंच खाऊ, इमानदारीने जगू. तेव्हाच विठ्ठलाचे आशीर्वाद मिळतील. हे ऐकूण उपस्थित सारेच सुखावले.

Web Title: This is true Vithu-Rakhmai, don't be tempted by money!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.