‘हेच का अच्छे दिन’; होळीपूर्वी महागाईचा धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2023 09:28 PM2023-03-01T21:28:54+5:302023-03-01T21:30:07+5:30
Nagpur News मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करून गृहिणींना महागाईचा मोठा धक्का दिला आहे.
नागपूर : मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करून गृहिणींना महागाईचा मोठा धक्का दिला आहे. नागपुरात एलपीजीचे दर ११०४.५० रुपयांवरुन ११५४.५० रुपये प्रति सिलिंडरवर पोहोचले आहेत. अशाप्रकारे होळीपूर्वी सामान्यांना पुन्हा एकदा महागाईची झळ बसली आहे.
यापूर्वी १ जुलै २०२२ रोजी घरगुती सिलिंडरच्या किमती बदलल्या होत्या. म्हणजेच सुमारे ८ महिन्यांनंतर घरगुती सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. सिलिंडरच्या दरवाढीवर गृहिणी संतप्त आहेत. एकीकडे मासिक उत्पन्नात वाढ नाहीच, मात्र, दुसरीकडे केंद्र सरकार गॅस सिलिंडरसह सर्वच वस्तूंच्या किमती वाढवित आहे. ’हेच का अच्छे दिन’ अशी संतप्त प्रतिक्रिया देत गृहिणींनी दरवाढ मागे घेण्याची एकमुखी मागणी केली आहे.
सिलिंडरची दरवाढ नकोच
इंधनासह गॅस सिलिंडरची किंमत सामान्यांच्या आटोक्यात हवी. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. उत्पन्नाच्या तुलनेत सिलिंडरची दरवाढ कधीही करू नये.
मृदुला कुळकर्णी, गृहिणी.
दरवाढ थांबलीच पाहिजे
वारंवार होणारी दरवाढ आता थांबलीच पाहिजे. उत्पन्नाच्या तुलनेत महिन्याचा खर्च वाढला आहे. काटकसर करताना गरिबाच्या नाकीनऊ आले आहे. सरकारने श्रीमंतांसह सामान्यांच्याही विचार करावा.
नीरजा दप्तरी, गृहिणी.
आता केवळ भाज्याच स्वस्त
स्वयंपाकघरातील सर्वच वस्तूंच्या दरवाढीने महिलांचे आर्थिक बजेट बिघडले आहे. गॅस सिलिंडरने त्यात भर टाकली आहे. सध्या भाज्या सोडून सर्वच वस्तू महाग आहेत. केंद्राने सामान्यांचा विचार करावा.
अस्मिता आठवले, गृहिणी.
महिन्याचा खर्च चालविणे कठीण
वारंवार वाढणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या छुप्या किमतीवर बोलणे कठीणच आहे. सिलिंडरच्या वाढीव दराने महागाईत भर टाकली आहे. महिलांना महिन्याचा खर्च चालविणे कठीण झाले आहे. दरवाढ मागे घ्यावी.
सरिता जीवतोडे, गृहिणी.
सरकारने गरिबांचा विचार करावा
खरंतर सरकारने गरीब कुटुंबाचा विचार करून सिलिंडरची किंमत ५०० ते ६०० रुपयांवर आणावी. दरवाढीने गरिबांचे कंबरडे मोडले आहे. आधीच सर्वच वस्तू महाग आहेत. हेच का अच्छे दिन, असे म्हणावे लागत आहे.
गीता निमखेडकर, गृहिणी.
दरवाढ होऊ नयेच
गरिबांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने गॅस सिलिंडरची किंमत कधीच वाढवू नये. दरवाढीचा गरीब व सामान्यांवर बोजा पडला आहे. स्वयंपाकघरातील सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. दरवाढ मागे घ्यावी.
वर्षा देशपांडे, गृहिणी.