यंदा थंडीपूर्वी ‘ऑक्टोबर हिट’चे चटके तीव्र, ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ
By निशांत वानखेडे | Published: October 16, 2023 04:37 PM2023-10-16T16:37:58+5:302023-10-16T16:40:15+5:30
दरवर्षीपेक्षा यंदा ऑक्टोबर हिटची दाहकता अधिक जाणवण्याची शक्यता
नागपूर : यंदा ऑक्टोबर हिटचे चटके अधिक तीव्रतेने जाणविण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अर्धा महिना लोटला असताना त्याची प्रचिती येत आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात दिवसाचे कमाल तापमान सरासरीच्या वर असून उकाड्याने नागरिकांचा त्रास वाढला आहे.
उत्तरेकडे पश्चिमी झंझावात आणि दक्षिणेत तामिळनाडूकडे चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाल्याने राज्यातील काही भागात दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. रविवारी नागपुरात आकाश दिवसभर ढगांनी व्यापले होते. त्यामुळे पारा अंशत: कमी झाला. सध्या ३४ अंशाच्या आसपास असून सरासरीपेक्षा अधिक आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दोन दिवस हलकी घट झाल्यानंतर १८ ऑक्टोबरपासून पुन्हा पारा उसळी घेऊ शकतो व उकाड्याचा परिणाम पूर्ववत जाणवू शकतो.
दरवर्षीपेक्षा यंदा ऑक्टोबर हिटची दाहकता अधिक जाणवण्याची शक्यता असुन संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा दुपारचे कमाल तापमान २ डिग्रीने तर पहाटेचे किमान तापमान ३ ते ४ डिग्रीने अधिक असण्याची शक्यता जाणवते. विदर्भ, मराठवाड्यात ही दाहकता अधिक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या विदर्भात अकोल्यात सर्वाधिक ताप वाढला आहे. येथे दिवसाचा पारा ३७ अंशाच्या वर चालला आहे. अमरावती, ब्रम्हपुरी, चंद्रपूर, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात पारा ३५ ते ३६ अंशाच्या आसपास आहे. रात्रीचा पारा २० ते २२ अंशाच्या आसपास आहे. त्यामुळे मध्यरात्री थंडीची चाहुल देणारा थाेडा गारवा जाणवताे. वाशिमला सर्वात कमी १८.४ अंश तर यवतमाळ १९.२ अंश व गडचिराेलीत १९.८ अंश किमान तापमान आहे. अवकाळी पावसाची शक्यता सध्यातरी कमीच असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.