यंदा दगडी चाळीत होणार 'डॉन' अरुण गवळीची दिवाळी, कारागृहाबाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू
By नरेश डोंगरे | Published: October 30, 2023 06:43 PM2023-10-30T18:43:27+5:302023-10-30T18:43:55+5:30
Arun Gawli : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी अनेक वर्षांनंतर यंदा त्याच्या दगडी चाळीतील साम्राज्यात दिवाळी साजरी करणार आहे. गवळी याच्यासह सुमारे पन्नासावर कैदीही यंदा त्यांच्या - त्यांच्या गावात आपापल्या कुटुंबीयांसोबत दिवाळीचे दिवे लावणार आहेत.
- नरेश डोंगरे
नागपूर : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी अनेक वर्षांनंतर यंदा त्याच्या दगडी चाळीतील साम्राज्यात दिवाळी साजरी करणार आहे. गवळी याच्यासह सुमारे पन्नासावर कैदीही यंदा त्यांच्या - त्यांच्या गावात आपापल्या कुटुंबीयांसोबत दिवाळीचे दिवे लावणार आहेत. कायदेशिर प्रक्रिया पार पाडून कैदी आपापल्या गावी परत जाण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर अनेक सिद्धदोष कैद्यांचे विविध सणवार कारागृहातच जातात. भक्कम तटबंदीच्या आतमध्ये त्यांना प्रत्येक सणवाराची माहिती दिली जाते आणि त्या निमित्ताने कारागृह प्रशासन गोडधोड पदार्थही खाऊ घालत असले तरी आपल्या कुटुंबियांसोबत, आपल्या गावात मुक्तपणे सणोत्सव साजरे करण्याचा आनंद कैद्यांना मिळत नाही. त्यामुळे अनेक कैदी त्यांच्या अर्जित आणि संचित (पॅरोल आणि फर्लो) रजा खास सणावारासाठी जमा करून ठेवतात आणि दिवाळी, दसरा अशा सणाच्या पूर्वी कारागृह प्रशासनाकडे रितसर अर्ज करून रजा मंजूर करून घेत सणाचा आनंद उपभोगतात. मात्र, त्यांची संख्या फारच कमी असते. प्रत्येक वेळी, प्रत्येकालाच मोठ्या सणाला बाहेर जाण्याची परवानगी मिळत नाही. त्यामुळे मन मारून ही मंडळी कारागृहातच पडून असतात. नागपूर कारागृहात अनेक विदेशी कैदी, विविध प्रांतातील बॉम्बस्फोटाच्या आरोपींसह अंडरवर्ल्डमधील अनेक शार्प शूटरही बंदीस्त आहेत. त्यात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याचाही समावेश आहे.
नगरसेवक कमलाकर जामसांडेकरच्या हत्येच्या आरोपात गवळीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर मुंबई कारागृहातून त्याची नागपूर कारागृहात रवानगी करण्यात आली होती. सात-आठ वर्षांपासून तो येथे बंदिस्त असला तरी वेगवेगळे कारण पुढे करून तो फर्लो आणि पॅरोलच्या आधारे कारागृहातून बाहेर जातो आणि ज्या दगडी चाळीत त्याचे साम्राज्य आहे. तेथे नातेवाईक आणि त्याच्या टोळीतील साथीदारांसह सुट्यांचा आनंद घेतो. यंदा दसरा, दिवाळी दगडी चाळीत साजरी करण्याचे त्याने अनेक दिवसांपासून नियोजन केले होते. त्यानुसार, त्याने फर्लोसाठी कारागृह प्रशासनाकडे अर्ज केला होता. कारागृह प्रशासनाने त्याचा अर्ज फेटाळल्यानंतर त्याने आपल्या वकिलामार्फत उच्च न्यायालयात धाव घेऊन तेथून २८ दिवसांचा फर्लो मंजूर करून घेतला. त्यामुळे १९ ऑक्टोबरला त्याची कारागृह प्रशासनाने येथून सुटका केली. अशा प्रकारे दगडी चाळीत पोहचल्यानंतर डॉनने तेथे दसरा साजरा केला. आता डॉन दगडी चाळीत दिवाळीची तयारी करीत आहे. यंदा अनेक वर्षांनंतर तो दगडी चाळीत दिवाळी साजरी करणार आहे.
तीस गेले आणि वीस-पंचेवीस जाणार
डॉन प्रमाणेच विविध गुन्ह्यातील पन्नासावर कैंद्यांना फर्लो, पॅरोल मंजूर झाल्याने ते सुद्धा आपापल्या कुटुंबीयांसोबत दिवाळीचा सण साजरा करणाार आहेत. आजपर्यंत ३० ते ३२ कैदी त्यांच्या त्यांच्या गावात परत केले असून, दिवाळीपर्यंत आणखी २०ते २५ कैदी बाहेर जाणार आहेत.
त्यांच्यावर सकारात्मक परिणाम होतो
कारागृहात राहून सुधरलेल्या (वर्तन चांगले असलेल्या) कैद्याना त्यांच्या हक्काच्या रजा मिळाव्या. त्यांनाही आपल्या कुटुंबीयांसोबत सणोत्सवाचा साजरा करता यावा, यासाठी कारागृह प्रशासन आवश्यक ती प्रक्रिया पार पाडत असते. वर्षभर ही प्रक्रिया सुरू असते. कुटुंबीयांसोबत राहता येत असल्याने बंदीवानांचे मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत होते आणि त्यांच्यावर सकारात्मक परिणाम होत असल्याचेही दिसून येते, अशी प्रतिक्रिया वजा माहिती कारागृह अधीक्षक वैभव आगे यांनी या संबंधाने बोलताना दिली.