यावर्षी नागपुरात कडक ‘नवतपा’; गुरुवारी रात्री सुरुवात तर २ जूनला समाप्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2023 20:09 IST2023-05-23T20:08:46+5:302023-05-23T20:09:17+5:30
Nagpur News यावर्षी नागपूरकरांना कडक नवतपाला तोंड द्यावे लागेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय ज्योतिषी डॉ. अनिल वैद्य यांनी वर्तविला आहे.

यावर्षी नागपुरात कडक ‘नवतपा’; गुरुवारी रात्री सुरुवात तर २ जूनला समाप्ती
नागपूर : यावर्षी नागपूरकरांना कडक नवतपाला तोंड द्यावे लागेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय ज्योतिषी डॉ. अनिल वैद्य यांनी वर्तविला आहे.
सूर्य येत्या गुरुवारी रात्री ८.५६ वाजता रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्या वेळेपासून नवतपाला प्रारंभ होईल. नवतपा हा नऊ रात्रीचा काळ असून या काळात सूर्य पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो. त्यामुळे संपूर्ण भारतासह इतर देशांमध्येही वातावरणातील उष्णता वाढते. यावर्षी देशाच्या विविध भागामध्ये चक्रीवादळ आले. तसेच, अनेक ठिकाणी वारंवार पाऊस येत आहे.
काही दिवसांपूर्वी अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळामुळे नागपुरातील दमटपणा वाढला आहे. परिणामी, या नवतपामध्ये नागपुरातील तापमान वाढून ४६ डिग्री सेल्शिअसच्यावर जाण्याची शक्यता आहे. नवतपा काळात सकाळी ५.४४ वाजता सूर्योदय तर, सायंकाळी ६.५४ वाजता सूर्यास्त होईल. दिवसाचा कालावधी १३ तासांपेक्षा जास्त राहील. त्यामुळे उष्णता वाढेल. २ जून रोजी सूर्य वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यानंतर नवतपाची समाप्ती आणि मान्सूनला सुरुवात होईल, अशी माहितीही वैद्य यांनी दिली आहे.