यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त, पण तलावात विसर्जन नाही; उंचीची मर्यादा हटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2022 11:07 AM2022-07-26T11:07:29+5:302022-07-26T11:08:15+5:30
मनपा आयुक्तांचे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आवाहन
नागपूर : राज्य शासनाने गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध हटविले आहे. त्यानुसार नागपूर शहरातही गणेशोत्सव निर्बंधमुक्त राहणार आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असून, शहरातील तलावात मूर्ती विसर्जनाला बंदी घालण्यात आली आहे.
राज्य शासनाद्वारे गणेशोत्सवाकरिता सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहे. त्यानुसार गणेश मंडळांच्या मंडपांच्या परवानगीसाठी घेण्यात येणारे २०० रुपये शुल्क माफ करण्यात आले आहे. मूर्तिकारांच्या मंडपासाठीचे शुल्क प्रमुख अग्निशमन विभागाने माफ केले आहे. तसेच मंडप उभारणीबाबत उद्यान विभाग, मालमत्ता विभाग व खासगी भूखंडावर आकारण्यात येणारे शुल्क माफ करण्यात आले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींसाठी चार फूट उंचीची मर्यादा घालण्यात आली होती. ती हटविण्यात आली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीसाठी उंचीचे कोणतेही निर्बंध असणार नाहीत. घरगुती मूर्तीसाठी असलेले दोन फूट उंचीची मर्यादा आता राहणार नाही. मात्र, घरगुती मूर्तीच्या उंचीवर स्वखुशीने दोन फूट उंचीची मर्यादा पाळण्याचे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
गणेश मंडळांनी परवानगी अर्जासोबतच किती फुटांची मूर्ती राहणार आहे व तो कुठे विसर्जन करणार हे पण नमूद करावे, जेणेकरून त्याप्रमाणे पोलीस विभागास बंदोबस्त तयारी करणे सोयीचे होईल, असेदेखील आयुक्तांनी सूचीत केले आहे.
पूजा आयोजक समिती, गणेश उत्सव मंडळ, व्यक्ती यांनी गणेश उत्सवामध्ये आरोग्य विषयक उपक्रम, शिबिर आयोजनास प्राधान्य द्यावे, कोरोना, मलेरिया, डेंग्यू आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय, तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करावी. तसेच सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास प्राधान्य देण्यात यावे, असेही आवाहन आयुक्तांनी केले आहे.
श्री गणेशाचे आगमन आणि विसर्जन रस्त्यांवर संबंधित वीज पुरवठादार यांच्यामार्फत विजेच्या व्यवस्थेबाबत संबंधित झोनचे सहायक आयुक्त यांच्या स्तरावर चर्चा करून आवश्यक ती सुधारणा (दिवा बत्तीची संख्या व क्षमता) करण्यात येईल. गणेशोत्सवाकरिता मंडप शुल्क माफ करण्यात आले असेल तरीसुद्धा विविध परिपत्रकांमध्ये असलेल्या अटी व शर्तींचे जसे- अग्निशमन दलाचे कोडीफाईड शर्ती, अनशासन खात्याचे अटी व शर्ती, प्लास्टिक व थर्माकोल बंदीबाबत शासकीय निर्देश, आदींचे पालन करणे आवश्यक आहे.
- गणेश मूर्तीवरील चार फूट उंचीची मर्यादा हटविली.
- गणेश मंडळांना परवानगीसाठी कोणतेही शुल्क नाही.
- मंडप उभारण्यासाठीही शुल्क आकारले जाणार नाही.
- घरगुती मूर्तींसाठी असलेली दोन फूट उंचीची मर्यादा हटविली.
- शहरातील तलावात मूर्ती विसर्जनाला पूर्णपणे बंदी.
- मनपा विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करणार
- चार फुटांहून अधिक उंचीच्या मूर्तींचे विसर्जन शहराबाहेर
- मिरवणुकीसाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार