यंदाही सूर्य आग ओकणार, उन्हाळा अधिक ‘ताप’दायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2022 10:57 AM2022-03-04T10:57:03+5:302022-03-04T11:07:34+5:30
यावर्षी एप्रिल व मे महिन्यात जवळपास १५ दिवस ४३ ते ४४ अंशावर राहील. चार ते पाच दिवस ४६ अंशावर पाेहोचेल तर मेच्या दाेन-तीन दिवस ४७ अंशावर पाेहोचण्याची शक्यता आहे. रात्रीचे किमान तापमान २ ते ३ अंशाने वाढण्याचीही शक्यता आहे.
निशांत वानखेडे
नागपूर : यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक असण्याची चिन्हे आहेत. यंदा महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्याचे तापमान सरासरीपेक्षा ०.९ ते १ अंशाने वाढेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
हा तापमानवाढीचा ट्रेंड २००१ पासून सुरू झाला. भौगोलिक परिस्थितीनुसार यंदाही विदर्भात सूर्याचा प्रकाेप अधिक जाणवेल. काही जिल्ह्यांत साधारणत: मे महिन्यात दाेनदा उष्ण लहरी (हीट वेव्हज) येण्याची शक्यता आहे.
हवामान विभागातर्फे मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांत तापमानाचा अंदाज मांडण्यात आला आहे. या अंदाजानुसार मार्च महिन्यात राज्यातील दिवसाचे कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक असणार. तीन महिन्यांत ते सरासरीएवढे राहील. मे महिना अधिक तापलेला असेल. रात्रीच्या किमान तापमानातही अधिक वाढ हाेण्याची शक्यता आहे. दाेन-तीन वर्षांच्या तुलनेत मागील वर्षी कमी तापमानाची नाेंद झाली. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ढगाळ वातावरणाचा परिणाम झाला हाेता. यंदा अवकाळी पाऊस कमी हाेण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
विदर्भाला ‘भाैगाेलिक’ ताप
विदर्भात सरासरी ४४ अंश तापमानाची नाेंद हाेते. गेल्या वर्षी चार ते पाच दिवस ४५ अंशावर पाेहोचले हाेते. यंदा मात्र तापमानात वाढ जाणवेल. यावर्षी एप्रिल व मे महिन्यात जवळपास १५ दिवस ४३ ते ४४ अंशावर राहील. चार ते पाच दिवस ४६ अंशावर पाेहोचेल तर मेच्या दाेन-तीन दिवस ४७ अंशावर पाेहोचण्याची शक्यता आहे. रात्रीचे किमान तापमान २ ते ३ अंशाने वाढण्याचीही शक्यता आहे.
- नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यात एक दिवस दिवसाचे तापमान ४८ अंशावर जाण्याचा अंदाज आहे.
- साधारणत: २५ एप्रिल ते २५ मेपर्यंत चार ते पाच दिवस चालतील, अशा दाेन उष्ण लहरींची शक्यता आहे.
- वर्धा, अमरावती व अकाेल्यात कमाल तापमान किंचित वाढलेले असेल. भंडारा, गाेंदिया, गडचिराेली, यवतमाळमध्ये तापमान सरासरी एवढे राहील.
- भाैगाेलिक परिस्थितीमुळे मे महिन्यात विदर्भात सूर्य डाेक्यावर आलेला असताे. २० ते ३० मे दरम्यानचा हा काळ असताे. ताे नवतपा म्हणूनही ओळखला जाताे. शिवाय संपूर्ण विदर्भात राजस्थान, गुजरातकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांचाही परिणाम हाेताे.
१९९० पासून आतापर्यंत तापमानात सरासरीपेक्षा १ अंशाची वाढ झाली आहे. २०३० ते २०५० पर्यंत त्यात २ अंशाने वाढण्याची शक्यता आहे. वाढ राेखली नाही तर गंभीर परिणाम जीवसृष्टीला भाेगावे लागतील. साधारणत: २००१ पासून हवामान बदलाचे परिणाम प्रकर्षाने जाणवायला लागले आहेत. त्यामुळे दरवर्षी तापमान वाढीचे रेकार्ड माेडत जातील. पावसाचे दिवस वाढले व ताे आकलन व नियंत्रणाबाहेर जात आहे.
- सुरेश चाेपणे, हवामान तज्ज्ञ.