‘त्या’ मृत शिक्षकांच्या वारसांना प्रत्येकी १५ लाख रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 11:31 PM2019-04-26T23:31:08+5:302019-04-26T23:32:28+5:30
निवडणुकीचे कामकाज आटोपून घराकडे परतीच्या प्रवासाला निघत असतानाच कारच्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुख्याध्यापक व तरुण शिक्षकाच्या वारसांना राज्य शासनाने प्रत्येकी १५ लाख रुपये सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे. ही रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली असून ते मृताच्या वारसांना वितरीत करतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणुकीचे कामकाज आटोपून घराकडे परतीच्या प्रवासाला निघत असतानाच कारच्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुख्याध्यापक व तरुण शिक्षकाच्या वारसांना राज्य शासनाने प्रत्येकी १५ लाख रुपये सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे. ही रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली असून ते मृताच्या वारसांना वितरीत करतील.
पुंडलिक बालाजी बाहे (५६) रा. राहाटे ले-आऊट आणि नुकेश नारायण मेंढुले (३८) रा. भांडारकर ले-आऊट अशी मृत शिक्षकांची नावे आहेत. मृत नुकेश मेंढुले हे अशोक कन्या विद्यालय उमरेड येथे तर पुंडलिक बाहे हे स्व. दामोधर खापर्डे विद्यालय, साळवा कुही येथे शिक्षक होते. या दोघांसोबत विजय नामदेव बोहरूपी आणि नरेंद्र भास्कर पिपरे या दोन शिक्षकांची निवडणूक मतदान कर्मचारी म्हणून हिंगणा विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रावर नियुक्ती करण्यात आली होती. मतदानाची प्रक्रिया पर पडल्यानंतर एकाच गावातील असल्याने मिळूनच परतीचा प्रवास करायचा असे त्यांनी ठरविले होते. रात्री उशिरापर्यंत निवडणूक प्रक्रिया चालली. प्रक्रिया आटोपल्यानंतर चारही शिक्षक एम. एच. १२ जी.एफ. ४५४७ या क्रमांकाच्या कारने हिंगणा येथून पहाटेच्या सुमारास उमरेडकडे रवाना झाले. नरेंद्र पिपरे हे वाहन चालवित होते. अशातच नागपूर येथून उमरेडच्या दिशेने येत असताना चांपा शिवारात अचानकपणे कार झाडावर आदळली. धडक एवढी जोरदार होती की, कारच्या समोरील भाग पूर्णत: चेंदामेंदा झाला होता. यातच नुकेश मेंढुले जागीच ठार झाले. अन्य तिघांना तातडीने नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले. पुंडलिक बाहे यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.
लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये निवडणूक कर्तव्यावर असताना या दोघांचा मृत्यू झाल्याने शासनाने त्यांच्या वारसांना सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे.