‘त्या’ पाच गावांनी काेराेनाला राेखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:08 AM2021-06-01T04:08:00+5:302021-06-01T04:08:00+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : तालुक्यातील रमझाम, साेनपूर व चिकनापूर या गावांसाेबत मुरडा, भीमनटाेला, पुसदा पुनर्वसन-२, खिंडसी व गाेंडीटाेला ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : तालुक्यातील रमझाम, साेनपूर व चिकनापूर या गावांसाेबत मुरडा, भीमनटाेला, पुसदा पुनर्वसन-२, खिंडसी व गाेंडीटाेला या पाच गावांनीही काेराेनाला संक्रमणाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात वेशीवर ठेवण्यात यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, ही सर्व गावे आदिवासीबहुल आहेत. प्रशासनावरील विश्वास, जबाबदारीची जाणीव व उपाययाेजनांची याेग्य अंमलबजावणी यामुळे हे सर्व शक्य झाल्याची माहिती त्या गावांमधील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह आराेग्य विभागातील कर्मचारी व नागरिकांनी दिली.
काेराेनाला वेशीवर राेखण्यात यश मिळवणारी ही आठही गावे कमी लाेकसंख्येची असून, गटग्रामपंचायत अंतर्गत येतात. मुरडा हे गाव मांद्री गटग्रामपंचायत अंतर्गत येत असून, या गावाची लाेकसंख्या ३११ आहे तर भंडारबाेडी गटग्रामपंचायतमधील भीमनटाेलाची लाेकसंख्या ११४, पुसदा पुनर्वसन-२ ची लाेकसंख्या ४०७, नवरगाव गटग्रामपंचायतमधील खिंडसीची लाेकसंख्या २० तर लाेधा-पिंडकापार गटग्रामपंचायतमधील गाेंडीटाेला या गावाची लाेकसंख्या १८१ आहे. या सर्व गावांमध्ये आजवर काेराेनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही.
गावात काेराेनाचा शिरकाव हाेऊ नये म्हणून या गावांमधील सर्व नागरिकांनी एकाेप्याने व सामाेपचारापने लढा दिला. गावात दाखल हाेणाऱ्या व्यक्तींवर काही निर्बंध लावले. त्यांना काेराेना निगेटिव्ह टेस्टचे प्रमाणपत्र अनिवार्य केले. साेडियम हायपाेक्लाेराईडची फवारणी करून गावाचे नियमित निर्जंतुकीकरण केले. गावात निरंतर सर्वेक्षण करण्यात आले. स्वच्छता पाळणे, संपर्क टाळणे, मास्कचा नियमित वापर करणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे, काेराेना चाचणी करवून लसीकरण करवून घेणे, त्यासाठी जनजागृती करीत प्रशासनावर विश्वास ठेवणे यावर विशेष भर दिल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली असून, याला खंडविकास अधिकारी प्रदीप ब्रम्हनाेटे यांनी दुजाेरा दिला आहे.
...
गावात बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवली जात आहे. त्यांना काेराेना टेस्ट रिपाेर्ट अनिवार्य केला आहे. नागरिक सर्व उपाययाेजनांचे काटेकाेर पालन करीत असून, त्यांनी सुरुवातीपासून काेराेना चाचणी व लसीकरणाला सकारात्मक प्रतिसाद दिला. ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत जनजागृतीही केली. त्यामुळे हे शक्य झाले.
- प्रतिभा मडावी,
सरपंच, भंडारबाेडी.
...
खिंडसी येथे काेराेनचा एकही रुग्ण आढळून आला नाही. गावात बाहेरच्या व्यक्तीला तपासणी केल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने जनजागृती केली असून, नागरिकांनी लसीकरण करवून घेतले. यात खरेतर जनतेचे प्रशासनाला सकारात्मक सहकार्य केल्याने काेराेना गावात दाखल झाला नाही.
- मंजुषा गेडाम,
सरपंच,
...
गाेंडीटाेला येथील नागरिकांनी काेराेना संक्रमण काळात बाहेरगावी जाणे टाळले हाेते. परिसरातील गावात काेराेना रुग्ण आढळून येताच ग्रामस्थांनी इतर गावांशी संपर्क ठेवला नव्हता. गावाच्या सॅनिटायझेशनसाेबतच जनजागृती व लसीकरणावर विशेष भर देण्यात आला.
- मुकेश भैसारे,
ग्रामसेवक, लाेधा पिंडकापार.
...
सध्या रामटेक तालुक्यात काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी हाेत आहे. परंतु, धाेका पूर्णपणे टळला नाही. काही छाेट्या गावांनी शासनाने सुचविलेल्या उपाययाेजनांचे पालन करीत काेराेना गावाबाहेर राेखण्यात यश मिळवले आहे. याचाच अवलंब इतर गावांमधील नागरिकांना करता येऊ शकताे.
- डाॅ. चेतन नाईकवार,
तालुका आराेग्य अधिकारी, रामटेक.