‘त्या’ संघ स्वयंसेवकांचा निर्धार कायम
By admin | Published: February 6, 2017 01:58 AM2017-02-06T01:58:01+5:302017-02-06T01:58:01+5:30
मनपा निवडणुकांचे तिकीट जाहीर झाल्यानंतर भाजपासोबतच संघ परिवारात खळबळ माजली आहे.
नेत्यांच्या शिष्टाईला यश नाहीच : अनेक प्रभागांत संघ विरुद्ध भाजप लढाई
नागपूर : मनपा निवडणुकांचे तिकीट जाहीर झाल्यानंतर भाजपासोबतच संघ परिवारात खळबळ माजली आहे. काही प्रभागांत भाजपा उमेदवारांसमोर उभ्या ठाकलेल्या संघ स्वयंसेवकांची मनधरणी करण्याचा विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात आला. मात्र कुठल्याही परिस्थितीत उमेदवारी मागे न घेण्याचा निर्धार संबंधित स्वयंसेवक उमेदवारांनी केला आहे.
शहरातील बऱ्याच प्रभागांमध्ये संघ परिवारातील कार्यकर्त्यांना तिकिटांचे आश्वासन मिळाले होते. मात्र ऐनवेळी स्वयंसेवकांना डावलण्यात आले. त्यामुळे नाराज स्वयंसेवकांनी दुसऱ्या पक्षाची कास धरत किंवा थेट अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करीत भाजपाला आव्हान दिले. यासंबंधात विविध नेत्यांनी या कार्यकर्ते व स्वयंसेवकांना संपर्क करीत उमेदवारी मागे घेण्यासंबंधात विनंती केली. मात्र बहुतांश जणांनी आपली उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्धार केला आहे. शहरातील १० हून अधिक जागांवर अशी स्थिती असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र प्रचारक रवींद्र जोशी यांच्या स्नुषा विशाखा जोशी या प्रभाग-१५ मधून शिवसेनेच्या तिकीटवरून निवडणूक लढणार आहेत. त्यांच्यामुळे भाजपाच्या उमेदवारांना फटका बसू शकतो, ही बाब लक्षात घेऊन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी विशाखा जोशी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
जे झाले ते झाले, आता पुढचा निर्णय विचार करून घ्या, असे गडकरी त्यांना म्हणाले. मात्र आपण आपल्या संकल्पावर कायम असल्याचे स्पष्ट करीत उमेदवारी मागे घेणार नसल्याचे जोशी यांनी सांगितले.
दुसरीकडे संघ परिवाराशी संबंधित व भाजपाच्या शहर कार्यकारिणीतील वरिष्ठ नेते श्रीपाद रिसालदार यांनीदेखील प्रभाग १९ मधून आपली उमेदवारी सादर केली आहे. त्यांनादेखील पक्षाच्या मोठ्या नेत्यांकडून संपर्क करण्यात आला. मात्र आता विषय संपला असून, मी निवडणूक लढणारच, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.(प्रतिनिधी)