एसआयटीची चौकशी मागणाऱ्यांनी ‘त्या’ फोटोची तपासणी करावी- दीपक केसरकर
By मंगेश व्यवहारे | Published: December 18, 2023 04:11 PM2023-12-18T16:11:37+5:302023-12-18T16:28:35+5:30
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
नागपूर : विधानसभेत मंत्री गिरीश महाजन यांचे फोटो झळकवून एसआयटीची चौकशी मागणाऱ्यांनी त्या फोटोची तपासणी करावी. हा फोटो नाशिकच्या एका मौलवीच्या पुतण्याच्या लग्नाचा २०१७-१८ मधील फोटो आहे. तेव्हा गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्री होते. पालकमंत्री असल्यामुळे ते लग्नाला गेले, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
सलीम कुत्ताला नाचताना संपूर्ण महाराष्ट्राला पाहिले आहे. आपले कृत्य लपविण्यासाठी दुसऱ्यांवर आरोप लावण्यात येताहेत. २०१७-१८चा एक फोटो आणायचा आणि तो दाखवून चौकशीची मागणी करायची, हे चुकीचे आहे. गिरीश महाजन पालकमंत्री असताना एका मौलवीच्या पुतण्याच्या लग्नाला गेले होते. कुंभमेळ्यात मुस्लिम समाजाने सहकार्य केले होते. त्यामुळे त्या धर्मातील व्यक्तीच्या लग्नाला पालकमंत्री असलेले गिरीश महाजन गेले. त्या लग्नातील पाहुणे कोण आहेत, याची माहिती कशी असणार. या प्रकरणी पूर्वीच चौकशी झाली आहे. त्यात धर्मगुरुचा कुठलाही दाउद इब्राहिमशी संबंध असल्याचे आढळलेले नाही. बडगुजर पाठीशी घालण्याचा हा प्रकार आहे. सभागृहात फोटो दाखविणाऱ्यांनी सांगायला हवे होत की हे फोटो जुने आहे. सभागृहातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण जनता पाहत असते. त्यामुळे लोकांचा गैरसमज होतो. सदस्यांना सभागृहाचे पावित्र्य जपले पाहिजे, असे दीपक केसरकर म्हणाले.
श्रेयासाठी मोर्चा
केवळ श्रेयासाठी राजकरण करायचे, मोर्चा काढायचे, ही आमची भूमिका नाही. मी स्वत: मुंबईचा पालकमंत्री आहे. धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. धारावीच्या जनतेच्या जीवनात चार क्षण सुखाचे यावेत त्याऐवजी नवीन विषय उकरून काढत प्रकल्पाला विरोध करणे चुकीचे आहे. धारावीतील कुणालाही घरापासून वंचित ठेवणार नाही. दोन वर्षांपर्यंत घरभाडे सरकार देईल, असे केसरकर यांनी सांगितले.