त्या दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगारांवर लागणार मकोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 09:54 PM2019-07-17T21:54:25+5:302019-07-17T21:55:50+5:30

तलवार आणि हॉकी स्टिक घेऊन शहरात वाहनांची तोडफोड आणि नागरिकांवर हल्ले करीत दहशत पसरविणारा गुन्हेगार आणि त्याच्या एका साथीदाराला गणेशपेठ पोलिसांनी अटक केली.

Those terror created goons will be booked under MCOCA Act | त्या दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगारांवर लागणार मकोका

त्या दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगारांवर लागणार मकोका

googlenewsNext
ठळक मुद्देदोघांना अटक, कुख्यात तडीपार राज व साथीदारांचा शोध सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तलवार आणि हॉकी स्टिक घेऊन शहरात वाहनांची तोडफोड आणि नागरिकांवर हल्ले करीत दहशत पसरविणारा गुन्हेगार आणि त्याच्या एका साथीदाराला गणेशपेठ पोलिसांनी अटक केली. फैजान शमीउल्ला खान (२२) आणि अजय कैलाश ठाकूर (२०) रा. संत्रा मार्केट, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. फैजान खान हा सराईत गुन्हेगार आहे. या घटनेचा सूत्रधार तडीपार फैजान ऊर्फ राज आणि त्याचे इतर साथीदार अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. राज आणि त्याच्या साथीदारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी पोलीस मकोकाची कारवाई करणार आहे. या प्रकारची घटना पुन्हा होऊ नये, यासाठी ठाणेदारांना आपापल्या स्तरावर कठोर पाऊल उचलण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
मंगळवारी पहाटे बाईकवर स्वार होऊन गुन्हेगारांनी शहरात जवळपास दीड तास हैदोस घालत दहशत पसरविली. त्यांनी टेका नाका, कमाल चौकात हैदोस घातला. त्यानंतर मोमीनपुरा येथील एका टी-स्टॉलवर तोडफोड केली होती; नंतर सेंट्रल एव्हेन्यूवरील सेवासदन चौकात १२ पेक्षा अधिक वाहनांची तोडफोड केली. तोडफोड करण्यापासून रोखणाऱ्या नागरिकांवरही हल्ला केला. यानंतर संत्रा मार्केटमध्ये हल्ला करून ऑटो व इतर वाहनांची तोडफोड केली होती. या घटनेमुळे शहर पोलिसातही खळबळ उडाली होती. शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. यानंतरही तडीपार गुन्हेगार अशाप्रकारे सर्रासपणे साथीदारांसह हल्ला करीत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्येही दहशत निर्माण झाली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ही घटना अतिशय गंभीरतेने घेतली आहे.
पोलिसांना या घटनेत फैजान खान, फैजान ऊर्फ राज बगड, अजय ठाकूर, शकील अली, अस्सी आणि ऋतिक गौर यांचा सहभाग असल्याची माहिती मिळाली. पोलीस आरोपींच्या शोधात होते. मंगळवारी रात्री फैजान व अजय ठाकूर पोलिसांच्या हाती लागले. सूत्रधार फैजान फरार झाल्याने अधिकारी चिंतेत पडले आहेत. फैजान तहसील पोलीस ठाण्यातून तडीपार झाला होता. नागरिकांचे म्हणणे आहे की, तो नेहमीच सेवासदन चौकात येतो. तिथे एमडीचे सेवन करण्यासोबतच जुगारही खेळतो.
सेवासदन चौकात दोन इमारती आहेत. रात्रीच्या वेळी इमारतीच्या खालच्या भागातील दुकाने बंद झाल्यानंतर राज आणि त्याच्या साथीदारांची गर्दी होते. ते रात्रभर येथे बसून अवैध कामे करीत असतात. रविवारी परिसरातील दुकाने बंद असल्याने दुपारपासूनच गुन्हेगारांची येथे गर्दी राहते. गुन्हेगार सक्रिय असल्याने येथे नेहमीच तणावाचे वातावरण असते. त्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी पोलीस चौकी उघडण्याची मागणी केली होती. पोलीस चौकीसाठी इमारतीचे मालक जागा द्यायलाही तयार होते. परंतु पोलिसांनी याला गांभीर्याने घेतले नाही. १५ दिवसांपूर्वीच राजला जुगार खेळताना पकडण्यात आले होते. परिसरातील नागरिकांनीच पोलिसांना याबाबत माहिती दिली असावी, असा राजला संशय होता. यामुळेच त्याने लोकांवर हल्ला केला असावा.
राज अनेक दिवसांपासून गुन्हेगारी विश्वात सक्रिय आहे. त्याच्या टोळीचा मध्य नागपुरात दबदबा आहे. सेवासदन चौक परिसरातील लोकांनी त्याच्या अवैध धंद्याला विरोध केल्यामुळे तो दुखावला होता. त्याने लोकांना गंभीर परिणाम भोगण्यास तयार राहा, अशी धमकी दिली होती. लोकांनी या धमकीला फारसे गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे राज आणखीनच संतापला होता.
हॉटेल मालकाशी जुनी दुश्मनी
फैजान खान आणि अजय ठाकूर हे केवळ सेवासदन चौक आणि संत्रा मार्केटमध्येच तोडफोड केल्याचे सांगत आहेत. फैजानचे म्हणणे आहे की, संत्रा मार्केटमधील हॉटेल मालकासोबत त्याची जुनी दुश्मनी आहे. हॉटेल मालकही अवैध धंद्यात सहभागी असल्याचे सांगितले जाते. त्याला अद्दल घडविण्यासाठी त्याने हल्ला केला. सेवासदन चौकातील घटनेबाबत मात्र तो काहीही सांगत नाही. सेवासदन चौकातील कृत्य फरार आरोपी राजच्या इशाऱ्यावरून करण्यात आले आहे. तो सापडल्यावरच खरा प्रकार समोर येईल. गणेशपेठ पोलिसांनी आरोपींविरुद्ध दरोडा, लुटपाट आणि दंगा पसरविण्याचा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना बुधवारी न्यायालयात सादर करून २० जुलैपर्यंत पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे. ही कारवाई डीसीपी राहुल माकणीकर, एसीपी राजरत्न बंसोड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुनील गांगुर्डे, पीएसआय उल्हास राठोड, एस.आर. गजभारे, हवालदार रहमत शेख, पंकज बोराटे, अजय गिरटकर आणि सूर्यकांत इंगळे यांनी केली.
अद्दल घडविण्याची तयारी
पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी या घटनेला अतिशय गंभीरतेने घेतले आहे. त्यांनी ठाणेदारांना या प्रकारची घटना खपवून घेऊ नका, असे निर्देश दिले आहेत. त्यांनी ठाणेदारांना स्वत: सक्रिय होऊन गुन्हेगारांविरुद्ध कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. गुन्हे शाखेलाही यादिशेने ठोस कारवाई करण्यास सांगितले आहे.

Web Title: Those terror created goons will be booked under MCOCA Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.