'त्या' दोन कार्स पाण्यावर तरंगत होत्या, मृत्यूही काही पावलांवर होता; पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2022 10:00 PM2022-07-18T22:00:54+5:302022-07-18T22:03:07+5:30

Nagpur News पुलावरून पाणी वाहत असल्याने बाजूला लावलेल्या दोन कार्स पाण्याचा प्रवाह वाढल्याने वाहून गेल्या.. काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्यातील प्रवाशांना वाचवण्यात यश मिळाले.

'Those' two cars were floating on the water, death was only a few steps away; But... | 'त्या' दोन कार्स पाण्यावर तरंगत होत्या, मृत्यूही काही पावलांवर होता; पण...

'त्या' दोन कार्स पाण्यावर तरंगत होत्या, मृत्यूही काही पावलांवर होता; पण...

googlenewsNext
ठळक मुद्देअडीच वर्षांच्या बाळासह दहा जणांचा ३ तास मृत्यूशी संघर्ष चिखलापार नदीच्या पुलावर थरार

 

नागपूर : ब्राह्मणमारी नदीचे पाणी पुलावरून वाहत असताना चालकाने प्रवाहात स्कॉर्पिओ घातली. यात ६ जणांचा जीव गेला. सावनेर तालुक्यातील ही घटना ताजी असताना रविवारी मध्यरात्री असाच काहीसा प्रकार भिवापूर तालुक्यातील चिखलापार नदीच्या पुलावर घडला. नदीच्या पुरात कारमधील १० जण अडकले. मृत्यू काही पावलावर असताना जीव वाचविण्यासाठी त्यांची तीन तास धडपड सुरू हाेती. पाेलिसांना याबाबत माहिती हाेताच त्यांनी तब्बल दोन तास रेस्क्यू ऑपरेशन राबवून त्या सर्वांचे प्राण वाचवले.

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) येथून लग्नकार्य आटोपून हिंगणघाट (जि. वर्धा) येथे परतीच्या प्रवासाला निघालेल्या एकाच कुटुंबातील दहा जणांना संकटाचा थरारक सामना करावा लागला. हिंगणघाट येथील एजाज खान गुलाम हुसेन खान हे ब्रह्मपुरी येथे नातेवाइकांकडे लग्न समारंभासाठी कुटुंबीयांसह रविवारी गेले होते. लग्न आटोपून मध्यरात्री परतीच्या प्रवासाला भिवापूर तालुक्यातील चिखलापूर नदीच्या मार्गाने दोन वेगवेगळ्या कारने निघाले.

परवेज खान मेहमूद खान पठाण (२५), अब्दुल नईन अब्दुल हनिफ (२७), मोहम्मद रफिक मोहम्मद अस्फाक (२५), मुजुम हबीब खान (३०), एजाज खान गुलाम हुसेन खान (५५), हिना खान (२३), नुजूमखॉन इरफान खान (१९), तबज्जून हुसेन खान (४५), साहिल इजाब खान (५०) आणि अडीच वर्षांचा आरीफ मुजीब खान सर्व रा. हिंगणघाट हे या दोन्ही कारमध्ये होते.

मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास चिखलापार नदीच्या पुलावर पाणी वाहत होते. एमएच-३१/सीएच-७५५२ क्रमांकाची इंडिगाे कार आणि एमएच-३४/के-६५४० क्रमांकाची स्विफ्ट डिझायर या दोन्ही कारच्या चालकांनी वाहने पाठोपाठ रस्त्याच्या कडेला उभी केली होती. अशातच नदीच्या पात्रातून पाण्याचे लोट आले. पूरस्थिती निर्माण झाली. दोन्ही वाहने पाण्यावर तरंगत होती. दहा जणांचे जीव संकटात होते. काय करावे काही कळत नव्हते. अशातच त्यांच्यापैकी एकाने २.०६ वाजताच्या सुमारास ११२ या पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क केला. १५ मिनिटात पोलिसांचा ताफा तिथे पोहोचला. त्यानंतर भिवापूर पोलीससुद्धा घटनास्थळाकडे रवाना झाले. दरम्यान, उमरेड पोलिसांनी बेसूर येथील गावकऱ्यांच्या मदतीने २.३० वाजताच्या सुमारास रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. सभोवताल काळाकुट्ट अंधार, मुसळधार पाऊस... यामुळे वाहने नेमकी कुठे अडकली आहेत. याचा अंदाज येत नव्हता. शेवटी पोलिसांनी दोराच्या सहाय्याने दोन्ही वाहनांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यात ते यशस्वी ठरत पहाटे ४.४५ वाजता दहाही जणांना बाहेर काढण्यात आले.

बेसूरवासीयांनी दिला मदतीचा हात

उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे, पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे, महेश भोरटेकर (भिवापूर), तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, सहायक निरीक्षक शरद भस्मे, ईश्वर जोधे, पंकज बट्टे, नितेश राठोड, सुहास बावनकर, उमेश बांते, तसेच बेसूर येथील गावकऱ्यांनी जोखीम पत्करून दहा जणांचा जीव वाचविला. परिस्थितीशी दोन हात करीत केलेल्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.

टायरची हवा सोडली

पुरात अडकलेल्यांच्या दोन्ही कार पाण्यावर तरंगत होत्या. त्या कधी प्रवाहासोबत नदीच्या पात्रात जातील याचा नेम नव्हता. दरम्यान, पोलीस आणि वाहनात अडकलेल्यांचा मोबाइल संवाद सुरूच होता. पोलिसांनी दोन्ही कारच्या टायरमधील हवा सोडण्यास सांगितले. मोठ्या हिमतीने वाहनांची हवा सोडण्यात आली. थोडे संकट टळले. दुसरीकडे पाणी कारमध्ये शिरले होते. यामुळे कारमधील सारेच भांबावून गेले होते. मृत्यू अगदी जवळच असल्याचा भास प्रत्येकाला होत होता. एकमेकांना हिंमत देत सारेच अस्वस्थ झाले होते.

Web Title: 'Those' two cars were floating on the water, death was only a few steps away; But...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर